Maharashtra Political Crisis, Eknath Shinde Live : राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला. यानंतर राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार धोक्यात येणार असे अनेक दावेही करण्यात येत आहेत. अशातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. शिवसेनेकडून वारंवार एकनाथ शिंदेंसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गुजरातमधील सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत १२ पेक्षा अधिक आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे रायगडमधील तिन्ही आमदारही संपर्क क्षेत्राबाहेर असून ते एकनाथ शिंदेंसोबत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने त्यांनी बंड पुकारल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. एकूणच या प्रत्येक घडामोडीच्या अपडेट्सचा आढावा…

Live Updates

Eknath Shinde Live Updates Today : शिवसेना नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर असल्याने राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय.

21:17 (IST) 21 Jun 2022
महाविकास आघाडीची वर्षा बंगल्यावर बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ उपस्थित होते. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे उपस्थित होते. एकनाथ शिंदे माझं ऐकतील असा विश्वास उद्धव ठाकरेंकडून यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

19:13 (IST) 21 Jun 2022
“१९८० मध्ये माझ्याकडे केवळ ६ आमदार असताना ४५ आमदारांनी…”; शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही क्रॉस वोटिंग झालं. यातून महाविकास आघाडीच्या हाती पुन्हा पराभव आला आणि भाजपाने सलग दुसऱ्यांदा आपले सर्व उमेदवार जिंकून आणले. यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं राजकीय भूकंप निर्माण झाला. याच क्रॉस वोटिंगच्या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. तसेच त्यांच्याकडे १९८० मध्ये ६ आमदार असताना कसे ४५ आमदारांची मतं मिळवली, याचा किस्सा त्यांनी सांगितलं. ते दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

सविस्तर बातमी…

18:37 (IST) 21 Jun 2022
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून बातचित

शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गुजरातमधील सुरत याठिकाणी गेले होते. यावेळी नार्वेकर आणि शिंदे यांच्यात ४० मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समजत आहे. यावेळी नार्वेकर यांच्या फोनवरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

17:53 (IST) 21 Jun 2022
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केवळ १८ आमदार हजर होते का? संजय राऊत म्हणाले…

संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत केवळ १८ आमदार होते हे वृत्त चुकीचं आहे. सुधारणपणे ३०-३१ आमदार उपस्थित होते. त्यांची यादी तिकडे आहे. गटनेतेपदी अजय चौधरी यांची एकमताने नियुक्ती झाली आहे. काही आमदार आमच्याशी दुरध्वनीवरून संपर्कात होते. सुहास कांदे, प्रताप सरनाईक, लता सोनावणे इत्यादी संध्याकाळपर्यंत पोहचतील.”

“लता सोनावणे जात प्रमाणपत्राच्या एका खटल्याच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयात आहेत. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीचा खटला आहे त्यासाठी ते दिल्लीत न्यायालयात आहेत. सुहास कांदे यांना सकाळीच सीबीआयची नोटीस आली आणि ते सीबीआय कार्यालयात गेले. असे अनेक आमदार जिकडे तिकडे आहेत. त्यातील ३१ आमदार मुंबईत होते. त्यांची यादी आणि सह्या आहेत,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

17:39 (IST) 21 Jun 2022
मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्यातील बैठक अर्ध्या तासात संपली

मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्यातील बैठक अर्ध्या तासात संपली, थोड्याच वेळात शिवसेना नेते माध्यमांशी बोलणार, शिवसेनेची भूमिका स्पष्ट होणार

17:18 (IST) 21 Jun 2022
दोन आमदारांना गुजरातमध्ये प्रचंड मारहाण, नितीन देशमुख यांना ह्रदय विकाराचा झटका : संजय राऊत

दोन आमदारांना गुजरातमध्ये प्रचंड मारहाण, नितीन देशमुख यांना ह्रदय विकाराचा झटका, आम्हाला जेवणाला बोलावलं आणि गाडीत टाकून सुरतला आणलं असा आरोप आमदारांनी केलाय, कुटुंबांनी तक्रार केलीय, संजय राऊत यांचे गंभीर आरोप

17:14 (IST) 21 Jun 2022
एकनाथ शिंदे यांची अडचण मला माहिती, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

एकनाथ शिंदे यांची अडचण मला माहिती, ईडी आणि सीबीआयचा आमच्यावरही दबाव, पण आम्ही पक्ष सोडला नाही, माझ्या पक्षासोबत गद्दारी केली नाही, काही लोक दबावात आलेत, अनेक आमदारांना धमक्या देण्यात आल्या, संजय राऊत यांचे गंभीर आरोप

17:04 (IST) 21 Jun 2022
दिल्लीतील राष्ट्रपती उमेदवार निवडीची बैठक संपवून शरद पवार मुंबईला रवाना

दिल्लीतील बैठक तातडीने संपवून शरद पवार मुंबईला रवाना, विरोधी पक्षांच्या राष्ट्रपती उमेदवार निवडीच्या बैठकीसाठी पवार दिल्लीत होते, मुंबईत परतल्यानंतर महाविकासआघाडीकडून काय निर्णय होतात याकडे सर्वांचेच लक्ष

17:00 (IST) 21 Jun 2022
निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या मतांवरुन आमदारांची नाराजी स्पष्ट : भागवत कराड

भागवत कराड म्हणाले, “राज्यसभा आणि विधान परिषदेत भाजपाला मिळालेल्या मतांवरून आमदार सरकारवर नाराज असल्याचं स्पष्ट दिसतंय.”

16:46 (IST) 21 Jun 2022
काही काळ अडवल्यानंतर नार्वेकरांची गाडी हॉटेल मेरिडियनमध्ये सोडली

काही काळ अडवल्यानंतर नार्वेकरांची गाडी हॉटेल मेरिडियनमध्ये सोडली, काही वेळातच बैठकीची शक्यता, एकनाथ शिंदे भेटीसाठी वेळ देतात की नाही यावरच बैठकीचं भविष्य

16:42 (IST) 21 Jun 2022
शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरांची गाडी हॉटेल मेरिडियनबाहेरच अडवली

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर व रविंद्र फाटक सुरतमध्ये दाखल, नार्वेकरांची गाडी हॉटेल मेरिडियन बाहेर अडवली, एकनाथ शिंदेंकडून ग्रीन सिग्नल नसल्याची चर्चा

16:23 (IST) 21 Jun 2022
शिवसेना नेते गुजरातमध्ये पोहचले, थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंसोबत बैठकीची शक्यता

मेरिडियन हॉटेलच्या शेजारील हॉटेलमध्ये शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर व रविंद्र फाटक पोहचले, एकनाथ शिंदेंकडून चर्चेस तयारी दर्शवल्यानंतर बैठक होणार, खासदार विनायक राऊतही पोहचण्याची शक्यता

16:05 (IST) 21 Jun 2022
“…तर मुंबई पोलिसांना कठोर कारवाई करावी लागेल” ; संजय राऊत यांचा इशारा

“अनेक आमदारांच्या कुटुंबीयांना तक्रार केली आहे. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने त्यांचं अपहरण करून सुरतला नेल्याची आणि जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. आतापर्यंत ९ आमदारांच्या कुटुंबाने तक्रारी केल्या आहेत. हे असंच चालू राहिलं तर मुंबई पोलिसांना कठोर कारवाई करावी लागेल,” असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

15:57 (IST) 21 Jun 2022
गुजरातमध्ये जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील, तर त्यांना आम्ही मुंबईत येऊन चर्चा करण्यास सांगितलं आहे. गुजरातमध्ये जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही. त्या सर्वांना मुंबईला येण्यास सांगितलं आहे.”

15:56 (IST) 21 Jun 2022
“आमदारांच्या बैठकीत गटनेतेपदाबाबत बदल”; संजय राऊत यांची माहिती

संजय राऊत म्हणाले, “आमदारांच्या बैठकीत गटनेतेपदाबाबत बदल करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे.”

15:51 (IST) 21 Jun 2022
नारायण राणेंचे ‘ते’ भाकीत खरे ठरणार?; जूनमध्ये मुख्यमंत्री पायउतार होणार असल्याचा एप्रिलमध्येच केला होता दावा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जूनमधील वादळात महाविकास आघाडी सरकार कोसळून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतील, असे भाकीत १९ एप्रिल रोजी वाशीम दौऱ्यात केले होते. शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे नारायण राणेंनी दोन महिन्यांपूर्वी केलेले ते भाकीत आता चर्चेत आले आहे. राणेंचे भाकीत खरे ठरणार का, यावरून आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. 

सविस्तर वाचा

15:31 (IST) 21 Jun 2022
“गुजरातमध्ये आमच्या आमदारांवर खुनी हल्ले”; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

संजय राऊत म्हणाले, “बऱ्याच दिवसांपासून ऑपरेशन लोटस सुरू होतं. तसं नसतं तर आमच्या आमदारांचं अपहरण करून गुजरातला नेलं नसतं. त्यांना गुजरात पोलीस व केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात ठेवण्यात आलंय. अनेक आमदारांनी तेथून सुटकेचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दहशत बसवण्यात आली. आमदारांवर खुनी हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. काही आमदारांनी आमच्या जीवाला धोका आहे, इथे आमचा खूनही होऊ शकतो, असं कळवलं आहे.”

15:14 (IST) 21 Jun 2022
“समझनेवाले को इशारा काफी”; एकनाथ शिंदेंच्या ट्वीटवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

चंद्रकांत पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना ट्विटमध्ये काय म्हणायचं आहे याबाबत 'समझनेवाले को इशारा काफी' एवढंच मी म्हणेल. आत्ता कुठलंही मत व्यक्त करणं थोडं घाईचं होईल. त्यामुळे 'वेट अँड वॉच' अशी भाजपाची स्थिती आहे. काल रात्री अचानक असा मेसेज आला की काहीजण असे नॉट रिचेबल आहेत. त्यातून हळूहळू विषय पुढे चालला आहे.”

15:07 (IST) 21 Jun 2022
शिवसेनेचे कोणते आमदार संपर्काबाहेर आहेत? वाचा संपूर्ण यादी…

एकनाथ शिंदे – कौपरी

अब्दुल सत्तार – सिल्लोड – औरंगाबाद

शंभूराज देसाई – सातारा

संदीपान भुमरे – पैठण – औरंगाबाद

उदयाससह राजपूत – कन्नड – औरंगाबाद

भरत गोगावले – महाड – रायगड

नितीन देशमुख – बाळापूर – अकोला</p>

अनिल बाबर – खानापूर – आटपाडी – सांगली

विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम

संजय गायकवाड – बुलढाणा

संजय रामुलकर – मेहकर

महेश सिंदे – कोरेगाव – सातारा

शहाजी पाटील – सांगोला – सोलापूर

प्रकाश आबिटकर – राधापुरी – कोल्हापूर

संजय राठोड – दिग्रस – यवतमाळ

ज्ञानराज चौघुले – उमरगास – उस्मानाबाद

तानाजी सावंत – पारोडा – उस्मानाबाद

संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम

रमेश बोरनारे – बैजापूर – औरंगाबाद

14:58 (IST) 21 Jun 2022
मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेतून कोण उपस्थित? वाचा…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान बोलावलेल्या बैठकीला उपस्थित असलेले शिवसेना आमदार, पदाधिकारी खालील प्रमाणे,

१. वैभव नाईक

२. दिवाकर रावते

३. उदयसिंग राजपूत

४. विनायक राऊत

५. नरेंद्र दराडे

६. अनिल देसाई

७. विकास पोतनीस

८. सुभाष देसाई

९. वरून सरदेसाई

१०. अरविंद सावंत

११. किशोर दराडे

१२. किशोर साळवी

१३. आमशा पाडवी

१४. चंद्रकांत रघुवंशी

१५. रवींद्र वायकर

१६. गुलाबराव पाटील

१७. संजय राऊत

१८. नीलम ताई गोरे

१९. दादा भुसे

२०. सचिन अहिर

२१. सुनील शिंदे

२२. संजय राठोड

२३. सचिन पडवळ

२४. अंबादास दानवे</p>

२५. मंगेश कुडाळकर

२६. प्रकाश फातर्पेकर

२७. राहुल पाटील

२८. सुनील प्रभू

२९. दिलीप लांडे

३०. उदय सामंत

३१. राजन साळवी

३२. रमेश कोरगावकर

३३. अजय चौधरी

३४. राजू पेडणेकर

३५. दिपक केसरकर

३६. ज्योती ठाकरे

14:39 (IST) 21 Jun 2022
बंडखोरीच्या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांचं पहिलं ट्वीट; म्हणाले, “आम्ही सत्तेसाठी…”

एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.”

14:35 (IST) 21 Jun 2022
कल्याण पश्चिम शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर ‘नॉट रीचेबल’

कल्याण : विधान परिषद निवडणूक निकालानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे 'नॉट रीचेबल' झाल्यांनतर त्यांच्या खास मर्जीतील कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील संपर्काबाहेर गेले आहेत. आमदार भोईर यांचा मोबाईल स्विच ऑफ असून कुटुंबियांशी संपर्क साधला असता आमदार कुठे आहेत हे आपल्याला माहीत नसल्याचे सांगण्यात आले.

खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर आमदार भोईर हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच आहेत. दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिक सकाळपासून राजकीय घडामोडींकडे लक्ष लावून बसले आहेत. दुसरीकडे कल्याण पोलिसांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला आहे.

14:22 (IST) 21 Jun 2022
भाजपा नेते संजय कुटे सूरतमध्ये दाखल

भाजपा नेते संजय कुटे एकनाथ शिंदे थांबलेल्या सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा निरोप घेऊन ते पोहोचले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

14:04 (IST) 21 Jun 2022
महाविकास आघाडी सरकार बनण्यापूर्वी देखील असं बंड करण्यात आलं होतं – शरद पवार

महाविकास आघाडी सरकार बनण्यापूर्वी देखील असं बंड करण्यात आलं होतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. आमचा एक उमेदवार पराभूत झाल्यासंबंधी आम्ही चर्चा करु असं यावेळी त्यांनी सांगितलं. अडीच वर्ष सरकार योग्य चालत असल्यानं हे षडयंत्र आखण्यात आलं असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. तसंच राजकीय पेचातून मार्ग निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

14:04 (IST) 21 Jun 2022
डॉ. बालाजी किणीकरही संपर्काबाहेर घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मंगळवारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील त्यांचे खंदे समर्थक आमदार डॉ. बालाजी किणीकरही सोमवारी रात्रीपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डॉ. किणीकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र याबाबत त्यांच्या निकटवर्तीयांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही. मात्र खबरदारी म्हणून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. किणीकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

सविस्तर वाचा

13:53 (IST) 21 Jun 2022
महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता आहे.

13:37 (IST) 21 Jun 2022
दिपाली सय्यद यांचं ट्वीट; म्हणाल्या “शिवसेनेचा वाघ भाजपाला…”

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह संपर्काबाहेर असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे १५ ते ३५ आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून दिपाली सय्यद यांनीदेखील ट्वीट केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं असून असून शिवसेनेचा वाघ झेपणार नाही अशा शब्दांत सुनावलं आहे.

सविस्तर बातमी

13:27 (IST) 21 Jun 2022
शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता, पत्नी प्रांजली देशमुख यांच्याकडून अकोल्यात पोलीस तक्रार

शिवसेना आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांच्याकडून पोलिसांकडे तक्रार दाखल, मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर फोन बंद, कोणताही संपर्क नाही, सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

13:20 (IST) 21 Jun 2022
अमित शाह-नड्डांची तातडीची बैठक, नितीन गडकरी दिल्लीला रवाना!

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येणार की काय? अशी शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. सकाळी राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची तातडीची बैठक झाली असताना दुसरीकडे राज्यातील भाजपाचे महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील दिल्लीला रवाना झाले आहे. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

वाचा सविस्तर

12:58 (IST) 21 Jun 2022
“शिवसेनेची तीन नाही, तर १२ मतं फुटली”, भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा दावा

प्रसाद लाड म्हणाले, “शिवसेनेने दावा केला की त्यांची तीन मतं फुटली. त्यांनी हा दोष अपक्षांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शिवसेनेची १२ मतं फुटली आहेत. त्यात कोणते आमदार आहेत हे नावं सांगता येणार नाही, पण हा शिवसेनेला मोठा धक्का आहे. “

12:51 (IST) 21 Jun 2022
फुटीच्या धोक्याची पूर्वसूचना देणारा १३ जूनचा लोकसत्ताचा अग्रलेख

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले. शिवसेना आणि काँग्रेसची मते फुटल्याने महाविकास आघाडीला चिंता सतावत असतानाच एकनाथ शिंदे संपर्काबाहेर गेल्याने मोठा राजकीय भूकंप आला आहे. राज्यसभा निवडणूक निकालानंतर लोकसत्ताच्या १३ जूनच्या अग्रलेखात विश्लेषण करताना राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला होता. यावेळी राज्यात काय परिस्थिती उद्भवू शकते याचा सूचक इशाराही होता.

काय होतं अग्रलेखात?

राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या ‘यशा’चे श्रेय निर्विवाद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल तसेच सत्ताधारी आघाडीच्या केविलवाण्या पराभवाचे अपश्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घ्यावे लागेल. अमर्याद साधनसंपत्ती, केंद्रीय यंत्रणांची अदृश्य पण वास्तव भीती आदी कितीही कारणे भाजपच्या यशामागे विरोधकांकडून दिली जात असली तरी त्या सर्वामागे फडणवीस आणि भाजपचे अथक राजकीय कौशल्य आहे हे मुळीच नाकारता येणारे नाही. मुळात ही निवडणूक व्हायला नको होती, गेल्या २४ वर्षांत अशी काही निवडणूक या राज्याने पाहिलेली नाही, तीमुळे घोडेबाजाराची संधी निर्माण झाली वगैरे सर्व चर्चा आता फजूल ठरते. हे सर्व होणार याचा अंदाज भाजपखेरीज अन्य पक्षांना होता तर मुदलात त्यांनी निवडणूक ओढवून घ्यायला नको होती. स्पर्धेत उतरायचे की नाही याचा निर्णय ती सुरू होण्याआधी करायचा असतो. एकदा का स्पर्धा सुरू झाली की ‘‘परिस्थिती मला अनुकूल नव्हती’’, ‘‘पंच नि:स्पृह नाहीत’’ वगैरे किरकिर करणे निरर्थक. सत्ताधारी महाविकास आघाडीने ती करू नये. आपल्याखालून गाढव निघून गेल्यावर ते का गेले वगैरेंचा ऊहापोह मनाला समाधान देणारा असला तरी त्यामुळे गेलेले गाढव काही परत येत नसते. म्हणून असे झाल्यावर पुढे काय, या प्रश्नास भिडणे अधिक महत्त्वाचे. याबाबतही हेच वास्तव अधिक गंभीर आहे. त्याच्या विश्लेषणात ‘फडणवीस यांना माणसे आपलीशी करण्यात यश मिळाले’ हे शरद पवार यांचे प्रतिक्रियात्मक विधान सर्वार्थाने सूचक.

संपूर्ण अग्रलेख वाचण्यासाठी क्लिक करा

12:50 (IST) 21 Jun 2022
गुजरातमध्ये एकनाथ शिंदे थांबलेल्या हॉटेलबाहेर कडेकोट सुरक्षा; प्रत्येक वाहनाची तपासणी

राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या जवळपास १३ आमदारांसोबत संपर्काबाहेर आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गुजरातमध्ये सूरतमधील एका हॉटेलात आमदारांसोबत आहेत. दरम्यान सूरतमधील या हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतर कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आहे. पोलीस हॉटेलमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.

सविस्तर बातमी

12:45 (IST) 21 Jun 2022
एकनाथ शिंदेंनी प्रस्ताव दिल्यास स्विकारू; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही राजकीय पक्ष, एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव आल्यास आम्ही स्विकारू. संजय राऊत यांच्या महान नेतेगिरीमुळे शिवसेना अडचणीत आली. आम्ही शिवसेनेसोबत काम केलंय, त्यामुळे त्यांच्याविषयी प्रेम आहे. संजय राऊत शिवसेनेचं भयंकर नुकसान करत आहेत. ते नुकसान करण्याचं काम त्यांना कुणीतरी दिलंय.” ते एबीपी माझाशी बोलत होते.

12:33 (IST) 21 Jun 2022
एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये असलेले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख रुग्णालयात दाखल

एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये असलेले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख रुग्णालयात दाखल, पहाटे अस्वस्थ वाटल्याने, छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी सुरतच्या सिव्हिल रुग्णालयात, रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

12:13 (IST) 21 Jun 2022
नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर

मुंबई : विधान परिषद निवडणुकीतील शिवसेनेचे विजयी उमेदवार आमशा पाडवी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

12:11 (IST) 21 Jun 2022
थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद, काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष…

थोड्याच वेळात एकनाथ शिंदे गुजरातमधील सुरत येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

12:07 (IST) 21 Jun 2022
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल मनसे नेते नितीन सरदेसाईंच्या ट्वीटची चर्चा

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल येत आहेत. त्यांच्यासोबत एकूण १३ आमदार असून ते सध्या गुजरात राज्यातील सुरतमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हेदेखील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. नेहमीच नॉट रिचेबल असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचेच आमदार नॉट रिचेबल असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. वाचा सविस्तर

12:06 (IST) 21 Jun 2022
मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची बैठक, अनेक आमदार वर्षा निवासस्थानाकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी अनेक आमदार मुंबईत दाखल होत वर्षा निवासस्थानाकडे जात आहेत. अनेक आमदार मुंबईबाहेर असल्याने १२ वाजताची बैठक उशिरा सुरू होण्याची शक्यता

12:04 (IST) 21 Jun 2022
शिवसेनेचा बँड हा भाजपच्या राजकारणाचा एक अध्याय : नाना पटोले

नागपूर : नाना पटोले म्हणाले, “शिवसेनेचा बँड हा भाजपाच्या राजकारणाचा एक अध्याय आहे. पैसा आणि केंद्राच्या सत्तेचा गैरवापर होत आहे. भाजपाने असा मार्ग घेतलेला आहे. यात सत्याचाच विजय होईल. ऊन सावली हा निसर्गाचा नियम आहे. तसेच महाराष्ट्रात आलेल्या उन्हाचे सावलीत रूपांतर होईल. ही घटना रात्रीची आहे. मुंबईला सगळ्या नेत्यांची बैठक आहे. या सगळ्या गोष्टींची बैठकीत चर्चा केली जाईल.”

“सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी बहुमताचा आकडा अजून दूर आहे. निवडणुकीत मतदानाची बंडखोरी झाली आहे. याचं आत्मपरीक्षण केलं जाईन. आज मुंबईला जाणार आहे. सगळ्या आमदारांना बोलावलेलं आहे. तिथं या सगळ्या अडचणीतून बाहेर कसे पडता येईल आणि पार्टीची बळकटी कशी करता येईल यावर काँग्रेस भूमिका घेणार आहे,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

11:38 (IST) 21 Jun 2022
शाब्बास एकनाथजी, ….नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता : नारायण राणे

नारायण राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.”

11:36 (IST) 21 Jun 2022
‘नॉट रिचेबल’ एकनाथ शिंदे गुजरातमध्ये? मध्यरात्रीनंतर सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची ‘मातोश्री’ला भेट; सेना आमदारांच्या हॉटेलची सुरक्षा वाढवली

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत तरी यश आलेलं नाही. असं असतानाच आता एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही.

सविस्तर बातमी…

11:35 (IST) 21 Jun 2022
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असताना देवेंद्र फडणवीसांचा नाशिक दौरा रद्द, तातडीने दिल्लीला रवाना

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे १३ आमदार असल्याचे बोलले जात आहे. सध्या शिंदे या १३ आमदारांसोबत गुजरातमध्ये असल्याचेही म्हटले जात आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीसांच्या या अचानक दिल्लीवारीमुळे आणखी संभ्रम वाढला आहे.

सविस्तर बातमी…

11:32 (IST) 21 Jun 2022
एकनाथ शिंदेंसोबत राज्यातील कोण आमदार आहेत? ही घ्या संपूर्ण यादी

शिवसेना नेते एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने राज्यात राजकीय भूकंप आला आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला असताना एकनाथ शिंदे अचानक बेपत्ता झाले असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवारी विजयी झाले असताना शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटली आहेत. त्यातच एकनाथ शिंदेशी संपर्क होत नसल्याने त्यांनी बंड पुकारल्याची शक्यता व्यक्त होती आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत जवळपास २५ आमदार उपस्थित असल्याची चर्चा आहे.

सविस्तर बातमी…

11:32 (IST) 21 Jun 2022
“विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क नाही, पण…”; एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया

विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा विजय झाला असला तरी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असतानाच आता एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत यासंदर्भात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमी…

Eknath Shinde Live Updates Today : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय.