Eknath Shinde Health Update : राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात सायंकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यासाठी मुंबईत येणार आहेत. दरम्यान सत्तास्थापनेबाबत एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री मात्र त्यांच्या सातारा येथील दरे या गावात गेले आहेत. त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, त्यांची चौकशी करण्याकरता गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांची भेट न घेताच माघारी फिरावे लागले आहे. त्यातील काही कार्यकर्त्यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसंच, त्यांच्या उपचारांकरता वैद्यकीय पथकही दाखल झालं आहे. दरम्यान, त्यांची भेट घेण्याकरता जवळपासच्या भोर, कराड, सातारा येथून कार्यकर्ते येत असून त्यांची सदिच्छा भेट घेण्याच्या प्रतिक्षेत आहेत. काही कार्यकर्त्यांना ते आज भेटणार होते. भेटण्यासाठी प्रतीक्षाही करायला सांगितली. मात्र, ऐन वेळी त्यांनी भेट नाकारली आहे.
पण निरोप आला की…
कराडहून काही महिला कार्यकर्ता आणि पदाधिकारी आज दरे येथे आल्या होत्या. महिला कार्यकर्त्या म्हणाल्या, “आम्ही कळवलं होतं की आम्ही लाडक्या बहिणी म्हणून येथे येत आहोत. आम्हाला भेटण्यासाठी थांबण्यासही सांगितलं होतं. पण आता निरोप आला की आजारी असल्याने भेटू शकत नाहीत.”
Satara, Maharashtra: Caretaker Chief Minister Eknath Shinde is unwell with a fever and is undergoing treatment at his residence in his ancestral village in Satara. A team of doctors has arrived at his residence to provide medical care pic.twitter.com/w77xW9cCEM
— IANS (@ians_india) November 30, 2024
दुसऱ्या महिला कार्यकर्त्या म्हणाल्या, “एकनाथ शिंदे दरे गावात आलेत हे कळल्याबरोबर आम्ही कराडमधून बोटीने प्रवास करून त्यांना भेटायला आलो. पण डॉक्टरांची टीम आत गेल्याने काही बोलता येत नाही.”