साताऱ्याच्या सर्व लोकप्रतिनिधींनी सातारकर मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा अभिमानच असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. साताऱ्याच्या विकासाचा गाडा आणखी गतिमान होईल. त्यांना मिळालेल्या मुख्यमंत्रीपदाने साताऱ्याच्या गौरवात भरच पडली आहे. विकासाच्या प्रक्रियेत त्यांना खंबीर साथ देऊ अशी भावना जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्याचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती निवड झाल्याचा विशेष आनंद असल्याचे सांगितले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर चौथ्यांदा एकनाथ शिंदे यांच्यामुळे साताऱ्याला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. एकनाथ शिंदे व माझे व्यक्तिशः स्नेहाचे संबंध आहेत. साताऱ्याच्या चौफेर व समतोल विकासासाठी त्यांनी योगदान द्यावे आमचे त्यांना पूर्ण सहकार्य आणि साथ असेल असे म्हंटले आहे.

साताऱ्याने महाराष्ट्राला दिलेले मुख्यमंत्री –

सातारा सांगलीच्या मूळ भूमिपुत्रांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळण्याची परंपरा खूप मोठी असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे. कराडचे यशवंतराव चव्हाण, पदमाळ्याचे (सांगली) वसंत दादा पाटील, नांदवळ(कोरेगाव) शरद पवार, कलेढोणचे (खटाव) बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, कुंभारगाव कराडचे पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि आता माझ्या मतदारसंघातील दरेगावचे एकनाथराव शिंदे यांचा सर्व सातारकरांना सार्थ अभिमान आहे. सातारा जिल्ह्याच्या उज्वल परंपरेची जपणूक व महाराष्ट्र राज्याच्या तमाम जनतेची उत्तम सेवा त्यांच्या हातून घडो असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्ह्याचा सुपुत्र या नात्याने मला मनस्वी आनंद – पृथ्वीराज चव्हाण

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी शपथ घेतली त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यापूर्वी साताऱ्याला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यावेळी सर्वांनी राज्याच्या व जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर एकनाथराव शिंदे यांच्या रूपाने साताऱ्याला मुख्यमंत्रीपद मिळाले याचा जिल्ह्याचा सुपुत्र या नात्याने मला मनस्वी आनंद आहे. एकनाथ शिंदे यांच्या हातून राज्याचा धोरणात्मक विकास होईल, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

आम्हा सर्वांना आनंद आणि अभिमान – शंभुराज देसाई

ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारासाठी आम्ही ५० आमदारांनी जी भूमिका घेतली आणि आमचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी करावं, असा आग्रह आम्ही सर्व आमदारांनी धरला. आम्हाला या गोष्टीचे समाधान आहे की, आम्ही जी भूमिका घेतली त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि राज्याच्या नेतृत्वाने पाठिंबा दिला. आमच्याकडे ५०-५२ आमदार असताना आणि भाजपाकडे ११० आमदारांचे पाठबळ असताना एवढ्या मोठ्या गटाने शिंदे यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री पदासाठी केली याचा आम्हा सर्वांना आनंद आणि अभिमान आहे अशी भावना शंभुराज देसाई यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्याचा भूमिपुत्र मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसला याचा सातारकरांना अभिमान – शिवेंद्रसिंहराजे भोसले
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्याने विकासाची कामे गतीने होतील एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने, जावलीच्या मातीशी त्यांचा संबंध असल्याने विकासाच्या प्रक्रियेत त्यांची मोलाची साथ राहील. देवेंद्र फडणवीस यांच्या त्या सहकार्यामुळे सातारा जिल्ह्याच्या भूमिपुत्र मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसला याचा आम्हा सातारकरांना अभिमान आहे. असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ –

सातारा जिल्ह्याच्या विकासात त्यांनी महत्त्वाचे योगदान द्यावे – मकरंद पाटील

माझ्या मतदारसंघातील आणि साताऱ्याचे भूमिपुत्र असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले याचा मला सर्वात जास्त अभिमान आहे. नगर विकास मंत्री म्हणून महाबळेश्वर तालुक्यासाठी त्यांनी मला मोठे सहकार्य केले आहे. आता कोयनेचा व महाबळेश्वरचा हा भूमिपुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत असल्याबद्दल आम्हाला सर्वांनाच आनंद आहे. राज्याच्या, महाबळेश्वर तालुक्याच्या व सातारा जिल्ह्याच्या विकासात त्यांनी महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आमदार मकरंद पाटील यांनी म्हटले आहे.

याशिवाय आमदार शशिकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याबद्दल जावळीचे सुपुत्र म्हणून अभिमान असल्याचे सांगितले आहे. आपल्या माणसाला राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याचे ते नक्कीच सोने करतील असे त्यांनी म्हटले आहे .याशिवाय आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार मदन भोसले, सदाशिव सपकाळ, कांताताई नलावडे, शिवसेनेचे चंद्रकांत जाधव, शेखर गोरे आदींनी आपल्याला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचे आनंद झाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री झाल्याने जिल्ह्याच्या विकासाला मदत होईल अशी भावना सर्वांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde is proud of all the peoples representatives of satara for becoming the chief minister msr
First published on: 01-07-2022 at 19:11 IST