मुंबई: राज्यसभेच्या एका जागेसाठी पक्षातील अनेक नेत्यांनी देव पाण्यात ठेवलेले असताना शिवसेनेचे मुख्य नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या बेधडक प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना खासदारकी देऊन धक्कातंत्राचा वापर केला होता. तोच प्रयोग विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी शिंदे पुन्हा करणार असल्याची चर्चा आहे.
मागील महिन्यात राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेना शिंदे पक्षाने वाघमारे यांना संधी दिली. त्यावेळी पक्षातील नेते माजी खासदार आनंद आडसूळ, राहुल शेवाळे, संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा सुरु होती. चर्चेतील या नावांना कात्री मारुन शिंदे यांनी सामाजिक समन्वय साधताना वाघमारे यांना संधी दिली. ही उमेदवारी देताना महिला प्रतिनिधीत्व, राज्यसभेतील आवाज आणि ठाकरे पक्षाच्या खासदारांना नडू शकतील अशा वाघमारे यांचा विचार केला गेला. कमी बोलणाऱ्या पण कृती करणाऱ्या शिंदे यांच्या या धक्कातंत्राचा धसका पक्षातील नेत्यांनी घेतला आहे. विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत भाजपला पाच, शिवसेना शिंदे पक्षाला दोन आणि महाविकास आघाडीला मिळून एक असे प्रतिनिधीत्व मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या एका जागेवरुन ‘तू तू मै मै’ सुरु आहे. भाजपचे उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर केले जातील. त्याच पध्दतीने शिंदे पक्षाचे दोन उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. या दोन जागांसाठी पक्षातील अनेक पदाधिकारी इच्छूक आहेत.
महिला आरक्षण विधेयकाला सर्मथन देण्यासाठी अनेक इच्छूक महिलांनी आंदोलन केली. ठाण्यात शिंदे यांना पहिल्यापासून साथ देणाऱ्या काही शिलेदारांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाव सुचविले आहे. दोन जागांवर कोणाचे नशीब उजळणार आहे. याचा थांगपत्ता पक्षातील नेत्यांना लागत नाही. शिंदे राज्यसभा उमेदवाराप्रमाणे या ठिकाणीही धक्कातंत्राचा तोच प्रयोग करणार असल्याचे शिंदे यांच्या गोटातील एका नेत्याने सांगितले. यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
