राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात कायमच विळ्या-भोपळ्याचं नातं असल्याचं पाहायला मिळतं. हे दोन्ही गट एकमेकांवर नेहमीच आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. मात्र, काही प्रसंगी एकमेकांवर केलेल्या विनोदी टिप्पणीमुळे हास्यविनोदाचे प्रसंगही उद्भवतात. हे जसं अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिसून येतं, तसंच ते सभागृहाच्या बाहेरही अनेकदा दिसून येतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमधून असाच काहीसा प्रसंग समोर आला आहे. राज्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी गणेसोत्सव मंडळांना भेटी देण्यासाठी वेळ घालवल्याची टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या या भेटीगाठींवरून टोला लगावला होता. मुख्यमंत्र्यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन राज ठाकरेंच्या बाप्पांचं दर्शन घेतलं होतं. त्यासंदर्भात अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं. “तुम्हीच ओळखा..याआधी गणेशोत्सव वर्षानुवर्ष चालत आले आहेत. पण कधीही मागच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणी गणपतीच्या दर्शनाला कुणाच्या घरी गेले नाहीत. आम्हीही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही त्यांच्यासारखे कॅमेरे बरोबर घेऊन जात नाही. पण आता प्रवेश करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, कुणीतरी उतरतं. ते आत जातात. नमस्कार करतात. कशाला?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता.

Video : अजित पवारांप्रमाणेच हेही बंड फसेल असं वाटलं होतं का? एकनाथ शिंदे म्हणतात, “यावेळी मी…!”

“नाहीतर लोक म्हणतील हा बाबा बरा होता, आता..”

गणेशोत्सव काळात वेगवेगळ्या गणेशमंडळांना भेटी दिल्याबाबत विचारणा केली असता एकनाथ शिंदे म्हणाले, “गणेशोत्सव काळात सगळीकडे जाण्याची सवय मला आधीपासून आहे. मी कालपर्यंत सगळे गणेशोत्सव, कार्यक्रम अटेंड करत होतो. आता अचानक मुख्यमंत्री झाल्यानंतर हे बदललं तर लोक बोलतील कालपर्यंत हा बाबा बरा होता. आता बदलला. थोडा त्रास होतो मला. पण थोडं नियोजन करू आपण”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, यावेळी अजित पवारांना चिमटा काढताना मुख्यमंत्र्यांनी अर्ध पुण्य आपल्याला देण्याची विनंती केली. “मी फिरलो, त्यामुळे सगळ्यांना फिरायला लागलं. त्यांनाही पुण्य मिळालं. मी अजित पवारांना म्हणालो अर्ध पुण्य मला द्या”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde loksatta interview on ajit pawar targeting on ganeshotsav visits pmw
First published on: 25-09-2022 at 14:00 IST