मुंबई: नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात विकसित होणारी तिसरी मुंबई, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मिसिंग लिंक, वाढवण बंदर, मुंबई कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात उद्योग आणि गुंतवणुकीसाठी नव्या संधींची दारे खुली झाली आहेत. या संधींचा लाभ घेत ब्रिटनमधील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडनमध्ये केले.

मुंबई आणि लंडन ही जागतिक फिनटेक क्षेत्रातील महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यामुळे फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आणि ब्रिटन यांच्यात सहकार्य वाढविण्यास मोठा वाव आहे.भविष्यातील अर्थव्यवस्था आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची क्षमता असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर तरुण मनुष्यबळ उपलब्ध आहे. विविध उद्योग आणि व्यवसायांच्या गरजेनुसार कौशल्य प्राप्त केलेले मनुष्यबळ राज्यात तयार होत आहे. या मानवी संसाधनाचा योग्य वापर करून ब्रिटन आणि महाराष्ट्रातील उद्योगांनी परस्पर सहकार्य वाढवावे, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. ‘डिझाइन इन लंडन आणि मॅन्युफॅक्चर इन महाराष्ट्र’ या संकल्पनेतून दोन्ही देशांतील उद्योगांनी एकत्र काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे उद्योगांना कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबई विमानतळ, अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मिसिंग लिंक आणि वाढवण बंदर यांसारखे प्रकल्प पूर्णत्वाकडे गेल्याने मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील विविध भागांमध्ये उद्योग विस्तारण्याची क्षमता वाढली आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

भारतीय वस्तूंना ब्रिटनच्या बाजारपेठेत अधिक सुलभ प्रवेश मिळण्याबरोबरच ब्रिटनमधील वस्तू भारतात आणण्याची प्रक्रियाही सुलभ होणार आहे. या बदलत्या व्यापार वातावरणाचा फायदा महाराष्ट्राने घेण्याची गरज आहे. ब्रिटनमधील उद्योग, गुंतवणूकदार आणि उद्योजकांनी भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. उपलब्ध पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि मोठी बाजारपेठ यांचा एकत्रित लाभ घेत दोन्ही देशांनी उद्योग-सहकार्याची नवी भागीदारी निर्माण करावी, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे जाळे आणि ब्रिटनची तंत्रज्ञान-कौशल्य क्षमता यांची सांगड घातल्यास गुंतवणूक, रोजगार आणि व्यापाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असा संदेश शिंदे यांनी दिला.