एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
हृदयात महाराष्ट्र, मनात देशप्रेम आणि ओठांवर मराठमोळा ‘नमस्कार’, घेऊन मी ब्रिटिश संसदेत उभा होतो. समोर ब्रिटनच्या संसदेचे सदस्य, आजी-माजी महापौर, विविध देशांचे प्रतिनिधी आणि जगभरातील मान्यवर… एका सामान्य शेतकरी, कष्टकरी कुटुंबातून संघर्ष करत सार्वजनिक जीवनात पुढे आलेल्या माझ्यासाठी हा क्षण स्वप्नवत होता; पण त्याहून अधिक जबाबदारीची जाणीव देणारा होता. लंडनमध्ये तीन प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारताना माझ्या डोळ्यांसमोर केवळ सन्मान नव्हता, तर महाराष्ट्राची माती, मराठीजन होते. त्या ऐतिहासिक सभागृहात मराठी संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या गेल्या चार वर्षातील समृध्दीचा अभिमान मिरवत बोलताना मनात एकच ओळ होती, ‘धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी…’ त्या क्षणी जाणवले, महाराष्ट्रापासून दूर असलो तरी मनाची मुळे त्याच मातीत घट्ट रुजलेली आहेत.

या प्रवासाचे निमित्त असलेल्या सन्मानांनाही वेगळे महत्त्व होते. या दौर्‍यात मला ब्रिटीश पार्लमेंटमध्ये ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’, हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ आणि लंडन महाराष्ट्र मंडळाकडून ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ हे तीन प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आले. या मानपत्रांमध्ये मी मुख्यमंत्रिपदाच्या काळात सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांचा विशेष उल्लेख करण्यात आला. गोदावरी, कृष्णा आणि भीमेच्या परिसरातील या योजनांची चर्चा थेट थेम्सच्या तीरापर्यंत पोहोचावी, हा कर्तव्यपूर्तीचा सुखद क्षण होता.

लंडनच्या अवघ्या तीन दिवसांच्या व्यस्त दौर्‍यात मला तिथले नागरी नियोजन, वाहतूक शिस्त आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याची पद्धत जवळून अनुभवता आली. वेस्टमिन्स्टर परिसरातील थेम्स नदीचा काठ, लंडन ड्रिझल, लंडन आय, बिग बेन, डबल-डेकर बसेस आणि अंडरग्राउंड मेट्रो (दि ट्यूब) पाहताना ब्रिटिशांनी आपल्या संस्कृतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन कसे जपले आहे, हे प्रकर्षाने जाणवले. जुन्या वास्तूचे सौंदर्य आणि गांभीर्य अबाधित ठेवत तिचा उपयोग आजही कार्यक्षमतेने कसा केला जाऊ शकतो, याचे ही वास्तू एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ऐतिहासिक वारसा, आधुनिक जीवनशैली आणि सांस्कृतिक विविधता यांचा अद्भुत संगम लंडन दौर्‍यात अनुभवायला मिळाला. लंडनल्या वाहतुकीला असलेली शिस्त तर कमालीची. कुठेही आवाज नव्हता. सगळे नियमांनुसार वागत होते. वाहनेच काय पण पादचारीही शिस्तीत होते.

आपल्या भारताला आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, प्राचीन मंदिरे असा समृद्ध वारसा लाभला आहे. हा सर्व वारसा आपणही तितक्याच तळमळीने, अभिमानाने जपायला हवा. ‘विकास के साथ विरासत भी’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीनुसार महायुती सरकारही हा वारसा जपण्यासाठी नेटाने काम करत आहे.

इथे मला प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराला उत्तर देताना मी इंग्रजीत भाषणे केली. पण, भाषणाची सुरुवात मराठीच होती. ‘नमस्कार’, जय हिंद, जय महाराष्ट्र यावर झालेला टाळ्यांचा कडकडाट मनात कायम रुंजी घालेल. भाषणात जाणवणारा आत्मविश्वास केवळ शब्दांमधून नाही; तो केलेल्या कामातून आणि महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेच्या प्रेमातून आलेला आहे. या दौर्‍यात महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि जागतिक गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करीत आहे.

महाराष्ट्र त्यात अग्रभागी आहे. ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’ आणि महाराष्ट्र-भारत-यूके संवादाच्या माध्यमातून मी ब्रिटनमधील मंत्री, उद्योगपती आणि एनआरआय यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था फ्रजाईल फाईव्हवरून फॅन्टॅस्टिक फाईव्हमध्ये कशी आली, हे सांगतानाच महाराष्ट्राची बदलती क्षमता विशद करत नवी मुंबई विमानतळ परिसरातील ‘तिसरी मुंबई’, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक, वाढवण बंदर, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या भव्य प्रकल्पांची माहिती दिली. ‘डिझाइन इन लंडन आणि मॅन्युफॅक्चर इन महाराष्ट्र’ ही संकल्पना मांडत इलेक्ट्रिक वाहने, हरित हायड्रोजन, फिनटेक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांतील गुंतवणुकीसाठी सकारात्मक चर्चा केली. काही चर्चांना व्यावसायिक करारांचे रूप मिळेल, असा विश्वास वाटतो.

लंडनमध्ये मी केवळ महाराष्ट्राची माहिती देत नव्हतो; तर नवे शिकत होतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छता आणि नागरी नियोजन याकडे लक्ष दिले. काही चांगल्या गोष्टी राज्यात करण्याचा संकल्प केला. जुन्या इमारतींचे सौंदर्य, ऐतिहासिक वास्तू जपण्याची तेथील पद्धत लक्षवेधी वाटली. नव्या इमारती उभारताना त्यांची वास्तुरचना जुन्या परिसराशी सुसंगत ठेवण्याचे वेगळेपण नोंदवले. आपल्याकडेही शहरांची ओळख ठरवतील, विदेशी पर्यटकांना आकर्षित करतील अशा आयकॉनिक वास्तूंची गरज आहे, हे प्रकर्षाने जाणवले. तोच विचार करून नगरविकास विभागाने आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी विशेष सवलत दिली आहे. त्यातून अशाच भव्यदिव्य इमारती उभारणीला प्रोत्साहन देण्याचे बळही या निमित्ताने मिळाले.

या सोहळ्याबरोबरच लंडनने मला इतिहासाच्या महत्त्वाच्या पानाशी भेट घडवली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील ऐतिहासिक स्मारकाला भेट देऊन मी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि हे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रसाराचे केंद्र बनवण्याचा संकल्प केला. बाबासाहेबांच्या वस्तू, पुस्तके, छायाचित्रे या आठवणी पाहताना जणू इतिहासाची पानेच उलटत असल्याचा भास झाला. डॉ. बाबासाहेबांची बुद्धिमत्ता, परिश्रम आणि शोषितांच्या मुक्तीसाठीचा ध्यास जाणवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक स्मारकाचे साक्षीदार होता आले हे माझे भाग्य समजतो. या स्मारकाचे केवळ जतनच नाही, तर परदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांच्या प्रसाराचे हे केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे.

तसेच, ९० वर्षांची परंपरा असलेल्या लंडन महाराष्ट्र मंडळाला भेट दिली. सरकारने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या मदतीमुळे हे मंडळ आता स्वत:च्या वास्तूत उभे राहत आहे. याच मंचावरून मी पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली आणि जगभरातील मराठी माणसांना एका सूत्रात बांधण्यासाठी जागतिक संघटना उभारण्याचा मानस व्यक्त केला. महाराष्ट्र मंडळाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा शब्दही मी दिला. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, त्यामुळे त्याबद्दल निश्चिंत असावे, हे सांगणे ओघाने आलेच लंडनमधील मराठी उद्योजक, संशोधक आणि विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांच्या कर्तृत्वगाथा ऐकताना जगभरातील या मराठी संस्थांनी एकत्र येऊन एक जागतिक संघटना उभी करावी, असा एक विचार मनात आला. जगाच्या विविध भागांत विखुरलेल्या मराठी माणसाच्या सामथ्र्याला एका सूत्रात बांधता आले, तर महाराष्ट्रासाठी त्यातून मोठे बळ निर्माण होईल. त्यासाठी पुढाकार घेण्याचा माझा मानस आहे.

या संपूर्ण दौर्‍यात अनेक आपुलकीचे आणि वैयक्तिक स्पर्श लाभले. लंडनमध्ये २५ वर्षे राहणार्‍या एका बहिणीने मला राखी बांधून सीमाभागातील मराठी मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. एका पंजाबी बांधवाने माझ्या माथ्यावरील टिळ्याचे कौतुक केले, तर कोव्हेंड पार्कच्या रस्त्यावर उभं राहून लवंगी मिरचीसोबत दोन वडापाव खाण्याचा आनंदही मी घेतला.

क्रिकेटपटू विराट कोहलीने भेटून महाराष्ट्राच्या क्रीडा प्रगतीवर चर्चा केली. वैयक्तिक पातळीवर, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकणारा माझा मुलगा डॉ. श्रीकांत मला एका हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला,बापाचे होणारे कौतुक बघून मुलाच्या डोळ्यात दिसणारा आनंद शब्दात मांडता न येणारा आहे. माझ्या बाबांनी फोन करून केलेले कौतुकही शब्दांच्या पलीकडे होते. पुरस्कार सोहळा झाल्यानंतर माझ्या पत्नीनेही मला फोन केला. महाराष्ट्राच्या या भूमीतून तुम्हाला कडक सॅल्यूट, असे तिने म्हटल्यानंतर मला इथपर्यंत पोहचवण्यासाठी तिने घेतलेल्या कष्टांचे चीज झाल्याची भावना होती.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी माणसे जोडण्याची जी शिकवण दिली, ती माझ्या ठायी कायम राहो, अशी प्रार्थना करीत थेम्सचा निरोप घेतला. लंडनहून परतताना माझ्यासोबत केवळ पुरस्कार नव्हते. काही अनुभव होते, जगाकडून शिकलेले धडे होते, इतिहासाकडून मिळालेले बळ होते आणि महाराष्ट्रासाठी मनात रुजलेले काही नवे संकल्प होते. ते संकल्प पूर्ण करण्याचे बळ राज्यातील १२ कोटी जनतेच्या आशीर्वादाने मिळो, हीच प्रार्थना!