Eknath Shinde Mala Kahi Sangaychay Marathi Natak : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये शिवसेना पक्षात मोठी बंडखोरी केली. पक्षातील ४० आमदारांना बरोबर घेत त्यांनी वेगळी चूल मांडली. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आणि पाठोपाठ निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देखील दिली. तसेच या पक्षाने भाजपाबरोबर युती करत राज्यात सत्तास्थापन केली. तेव्हापासून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील हा सत्तासंघर्ष लवकरच व्यावसायिक रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित नवं कोरं एकपात्री नाटक आता रंगभूमीवर अवतरणार आहे. अभिनेता संग्राम समेळ या नाटकात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात आहे.

एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीवर आधारीत नवं नाटक रंगमंचावर येऊ पाहतंय. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारीत ‘धर्मवीर’ व ‘धर्मवीर २’ असे दोन चित्रपट तयार झाले आहेत. यापैकी पहिला चित्रपट प्रदर्शित झाला असून दुसरा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पाठोपाठ कर्मवीर नावाचं पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे. आता शिंदेंच्या राजकीय जीवनावर आधारित नाटक रंगमंचावर येत आहे. या एकपात्री नाटकाद्वारे शिंदेंचा राजकीय प्रवास उलगडला जाणार आहे.

हे ही वाचा >> Dombivli Assembly Constituency : भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी सुरुंग लावणार का? डोंंबिवलीत बहुरंगी लढतीची शक्यता!

काय आहे नाटकाचं नाव?

या नाटकाद्वारे कोणत्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार? पडद्यामागच्या कोणत्या घटना उलगडल्या जाणार? शिंदेंच्या बंडाबाबत या नाटकात काय पाहायला मिळणार? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ‘मला काही सांगायचंय – एकनाथ संभाजी शिंदे’ असं या नाटकाचं नाव असून हे एकपात्री नाटक आहे. प्राध्यापक, डॉ. प्रदीप ढवळ यांनी हे नाटक लिहिलं आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ व अभिनेता संग्राम समेळ हे या नाटकाचं सादरीकरण करणार आहेत. प्रेरणा कला संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. हे नाटक सध्या सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आलं आहे. सेन्सॉरच्या मान्यतेनंतर हे नाटक रंगभूमीवर अवतरेल.

‘मला काही सांगायचंय’ या नाटकाचं पोस्टर (PC : Sangram Samel/Insta)

हे ही वाचा >> ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीवर नाटक येतंय. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाटकात काय पाहायला मिळेल, याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे.