मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे, अंतरवाली सराटीत मागील काही दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं. मात्र, त्यांच्या मागण्यांबाबत सरकारने कोणताही ठोस तोडगा न काढल्यामुळे आता मनोज जरांगे हे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. यासाठी जरांगे यांनी आपल्या मुंबई मोर्चाची घोषणा केलेली आहे. यासाठी ते अंतरवाली सराटीवरून मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाले आहेत.

मनोज जरांगे हे चार दिवसांच्या मुक्कामानंतर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी पोहोचणार आहेत. आता जरांगे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘गणेशोत्सवात कोणतंही विघ्न येता कामा नये, अशी सरकारची भूमिका आहे. तसेच टीका करताना कुणीही राजकीय भूमिका घेता कामा नये’, असं सूचक भाष्य उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमकी कुणाकडे आहे? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“गणेशोत्सवात कोणतंही विघ्न येता कामा नये, सरकारची अशी भूमिका आहे. गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची काळजी सरकार घेत आहे. याआधी ५८ मोर्चे झाले होते, त्या मोर्चाची जगाने नोंद घेतली होती. त्या मोर्चाच्या माध्यमातून कधीही कोणाचीही अडचण झाली नाही किंवा होऊ दिली नाही. त्यामुळे आता सरकार म्हणून आमची इच्छा आहे की गणेशोत्सवात कोणाचीही गैरसोय होऊ नये, याची काळजी प्रत्येकानेही घेतली पाहिजे”, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

‘कोणीही राजकीय भूमिका घेता कामा नये’

मनोज जरांगे आंदोलनासाठी मुंबईत येणार आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “सरकार म्हणून आमच्यावर कोणालाही टीका करण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. मात्र, टीका करत असताना त्यामध्ये समाजाची बाजू असली पाहिजे. समाजाला न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे. पण कुणीही राजकीय भूमिका घेता कामा नये. समाजाला न्याय देण्यासाठी एखादा माणूस झगडत असेल तर त्यासाठी सरकारने देखील मोठ्या मनाने मदत केली. हे सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. सरकारने आडमुठेपणाची भूमिका कधी घेतली नाही, मग समोरच्या लोकांनीही आडमुठेपणाची भूमिका घेऊ नये”, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे मुंबई मोर्चासाठी रवाना

मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून आज (१५ सप्टेंबर) मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते चार ठिकाणी मुक्काम करत पाचव्या दिवशी ते मुंबईत दाखल होणार आहेत.

१५ सप्टेंबर : पहिला मुक्काम पाटोदा (जि.बीड).

१६ सप्टेंबर : दुसरा मुक्काम श्रीगोंदा (जि.अहिल्यानगर).

१७ सप्टेंबर : तिसरा मुक्काम हडपसर (पुणे).

१८ सप्टेंबर : चौथा मुक्काम खोपोली (रायगड).

१९ सप्टेंबर : रोजी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होतील.