राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सडकून टीका केली आहे. उस्मानाबादमधील ‘हिंदू गर्वगर्जना’ संवाद यात्रेदरम्यान भाषण करताना सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याच्या मुद्द्यावरुन त्यांना हिणवण्यात आल्याचा संदर्भ आपल्या भाषणा दिला. मात्र ज्या नेत्याला ‘ब्राह्मण म्हणून हिणवण्यात आलं त्यानेच मराठ्यांची झोळी भरली’ असं विधान सावंत यांनी आपल्या भाषणात केलं.

नक्की वाचा >> मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे गटाच्या तानाजी सावंतांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, “सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा सामाजाचे नेते असणाऱ्या सावंत यांनी उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. “आता बघा हे जे सरकार आलं २०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रचंड आरोप केले. त्यांना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला. मराठा क्रांती मोर्चा काढला. मग त्यांनी याला मुकामुर्चा म्हणून लिहिलं. मराठ्यांचा अपमान केला. आम्ही गप्प बसलो,” असं सावंत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी त्यांच्या जातीवरुन हिणवलं मात्र त्यांनीच मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याचं विधान सावंत यांनी केलं. “ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं त्या माणसाला. अरे पण त्याच ब्राम्हणानं या मराठ्यांची झोळी २०१७-१८ ला भरली. मराठ्यांना आरक्षण दिलं. ते टिकलं. दोन तीन बॅचेस बाहेर आल्या. त्यांना नोकऱ्या मिळाल्या,” असं सावंत म्हणाले.

नक्की पाहा >> ‘हिंदू मराठ्यांच्या मुठी आवळल्या तर…’, ‘सणासुदीच्या काळात…’; ‘पाकिस्तान जिंदाबाद’वरुन राज ठाकरेंचा संताप

मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांमध्ये आरक्षण गेल्याची आठवण सावंत यांनी करुन दिली. “२०१९ ला जेव्हा तुम्ही लोकांच्या विश्वासघात करुन सत्तेत आला. त्यावेळेस पुढच्या सहा महिन्यातच आमचं आरक्षण गेलं. म्हणजे आम्ही मराठे इतके मूर्ख, इतके वेंधळे की आम्हाला काहीच कळत नाही,” असं म्हणत सावंत यांनी आपल्या भाषणामधून महाविकास आघाडीतील घटक पक्षांना लक्ष्य केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde minister tanaji sawant says devendra fadnavis criticized for his brahmin caste but he gave reservation to maratha scsg
First published on: 26-09-2022 at 08:30 IST