scorecardresearch

“२०१९मध्ये काहींनी संपर्क केला होता, पण म्हटलं उद्धव ठाकरेंची हौस फिटू दे”, एकनाथ शिंदेंनी सांगितली २०१९ची आठवण!

एकनाथ शिंदे म्हणतात, “२०१९ला अजित पवारांचं बंड फसल्यानंतरही मला विचारणा झाली होती. काही जणांनी …!”

“२०१९मध्ये काहींनी संपर्क केला होता, पण म्हटलं उद्धव ठाकरेंची हौस फिटू दे”, एकनाथ शिंदेंनी सांगितली २०१९ची आठवण!
एकनाथ शिंदे ( ट्विटर )

राज्यात नवं सरकार स्थापन होऊन जवळपास तीन महिने झाले आहेत. मात्र, तरीदेखील अद्याप एकनाथ शिंदेंची बंडखोरी, शिवसेनेला पडलेलं खिंडार आणि हे सगळं कसं घडून आलं? याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमवीर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी काही खुलासे देखील केले असून त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. २०१९मध्ये निवडणुकांवेळीच वेगळा विचार मनात आला होता, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदेंनी केला आहे. तसेच, २०१४मध्येदेखील शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ करण्यात आलं होतं, असंही ते म्हणाले आहेत.

“आम्ही केलेला हा कार्यक्रम…”

ही बंडखोरी नेमकी का झाली? यासंदर्भात एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका यावेळी मांडली. “असा निर्णय घेताना फार विचार लागतो. हे काही छोटं काम नाही. आम्ही केलेला हा मोठा कार्यक्रम आहे. ही वेळ का आली? एवढ्या मोठ्या प्रमाणावर असंतोष का निर्माण झाला? याचं कारण एका दिवसात तयार झालेलं नाही. जेव्हा राजकारणात एखाद्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, एखादा पक्ष किंवा पक्षाचा नेता देव्हा याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा अशा मोठ्या घटना घडतात”, असं ते म्हणाले.

अजित पवारांचं बंड आणि उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद!

२०१९च्या विधानसभा निवडणुकांनंतर अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर घडलेल्या घडामोडींबाबतही एकनाथ शिंदेंनी भूमिका मांडली. “२०१९ला अजित पवारांचं बंड फसल्यानंतरही मला विचारणा झाली होती. काही जणांनी माझ्याशी संपर्कही केला होता. पण तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. म्हटलं जाऊ दे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची हौस फिटू दे. पण आज ५० आमदार घेऊन बाहेर पडल्यामुळे देशातच नाही, देशाबाहेरही माझं नाव झालं आहे. तेव्हा मी मुख्यमंत्री झालो असतो, तर आज झालं तेवढं माझं नाव झालं नसतं. आम्ही परफेक्ट कार्यक्रम केला आहे”, असा खोचक टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना यावेळी लगावला.

Video : “तेव्हाच शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं, पण मला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा!

“२०१९मध्ये जे झालं, ते विचित्र होतं”

“२०१९ मध्ये जे झाले ते सारेच विचित्र झाले. तेव्हा आम्ही शिवसेना-भाजप युती करून निवडणूक लढलो होतो. लोकांनी या युतीला मते दिली होती. त्यामुळे शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन व्हायला हवे होते. कारण आमची युती नैसर्गिक होती. बहुतांशी आमदारांचीही तशीच भावना होती. पण झाले उलटे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करण्यास बहुतांशी आमदारांचा विरोध होता. मी ही भूमिका नेतृत्वाच्या कानावर घातली होती”, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या