शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय. हा वाद आता न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत गेला आहे. असे असताना एकनाथ शिंदे गटाने युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिंदे गटाने उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तसेच राज्यभरात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा >>> “…तर खपवून घेतले जाणार नाही,” टक्केवारीचा उल्लेख करत फडणवीसांनी घेतली स्पष्ट भूमिका; म्हणाले “दोन वर्षांत…”

युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी अधिक माहिती दिली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवासेनेत काम करणारे तरुण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. मुंबईची जबाबदारी समाधान सरवणकर यांच्याकडे असेल. विविध विभागात वेगवेगळे तरुण काम करतील, असे पावसकर यांनी सांगितले.

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हाची लढाई न्यायालय, निवडणूक आयोगात सुरू असताना दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी मैदानावर घेण्यात येणार आहे. दोन्ही गटांनी या मेळाव्याचे टीझर, पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये आम्हीच खरी शिवसेना आहोत, याचा पुरेपूर प्रयत्न दोन्ही गटांकडून करण्यात आला आहे.