२८ जानेवारीला अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली. दरम्यान काही घडामोडी वेगाने घडत आहेत असं दिसून येतं आहे. ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान अजित पवार यांच्या जाण्यानंतर विविध चर्चाही रंगल्या आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. एकनाथ शिंदेंनी आज दिलीप सोपल यांचं कौतुक केलं आहे.जाणून घेऊ दिवसभरातली पाच महत्त्वाची विधानं.

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, गिरीश महाजन संतापले

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला होता. याच मुद्यावरुन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. तसेच सुहास बाबर यांच्या भाषेवरुन एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज द्यावी, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच आपली पहिली टर्म आहे, ती शेवटची ठरु नये, असा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला आहे. सुहास बाबर ज्या भाषेत बोलतायत ते चुकीचं आहे. त्यांची पहिलीच टर्म आहे. मला आश्चर्य वाटलं ते मुख्यमंत्र्यांना एकेरी बोलत आहेत असे गिरीश महाजन म्हणाले. पहिलीच वेळ आहे, मीच पक्ष चालवतो सगळे असं बोलत आहेत. त्यांचं विधान चुकीचं आहे. राजकारणाची सुरुवात आहे, वर्षभरापूर्वी निवडून आले आहेत. लहान आहेत नवीन आहेत, राजकारण समजून घ्यावे. शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. तोलून मापून बोललं पाहिजे, नाहीतर शेवटची टर्म ठरु नये असेही महाजन म्हणाले.

दिलीप सोपल यांचं एकनाथ शिंदेंनी केलं कौतुक

राज्यात काही दिवसांपूर्वी बार्शीच्या महाआघाडी पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली होती. कारण, एकमेकांविरुद्ध कट्टर उभ्या ठाकलेल्या दोन शिवसेना एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे महाआघाडीच्या या बार्शी पॅटर्नवर शिवसेना नेत्यांकडूनही ठोस स्पष्टीकरण आलं नव्हतं. आता, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकी जाहीर सभा घेतली. दिलीप सोपल यांच्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचं विधान बार्शी या ठिकाणी बोलताना केलं. विधानसभेच्या वेळी थोडी गाडी चुकली नाहीतर ते मंत्रिमंडळात असते असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी दिलीप सोपल यांच्याबाबत केलं आहे. तसंच दिलीप सोपल यांना बघायचं आहे ना मंत्रिमंडळात? असा प्रश्नही एकनाथ शिंदेंनी विचारला आणि त्यावर उपस्थित मोठ्याने हो म्हणाले. ठाकरेंच्या आमदाराला थेट ऑफर दिली अशी चर्चा यानंतर रंगली आहे.

अजित पवारांच्या अपघाताबाबत काय म्हणाले अमोल मिटकरी?

अमोल मिटकरी अकोल्यात म्हणाले, “सरपंचांनी असं वक्तव्य केलं होतं की कुणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्यांना वाचावयला गेलो तर अचानक स्फोट झाले. नंतर कळलं पाच मृतदेह त्या ठिकाणी सापडले. UGCA कडून सांगितलं जातं आहे की विमानात सहा जण होते. असं असूनही पाच मृतदेहच सापडतात, जी कागदपत्रं आहेत ती कुठेही जळालेली नसतात. आता हा घात आहे की अपघात? ज्या कंपनीचं विमान होतं त्या कंपनीवर एक वर्षापासून बंद होती. मी आधीही म्हटलं तसं की अजित पवारांच्या घड्याळावरुन ओळख पटली असं सांगितलं गेलं. पण आता तोही मुद्दा खोडून काढण्यात आला आहे. घड्याळावरुन ओळख पटली नाही. त्यांच्या अंगावर असलेल्या पांढऱ्या कपड्यांवरुन ओळख पटली असंही सांगितलं गेलं.”

प्रफुल्ल पटेल यांचं नाव अनावधानाने येतंच कसं?-गोगावले

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांचं अकाली निधन झाल्याने राज्यावर शोककळा पसरली. या निधनानंतर अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन जोरदार चर्चा सुरू झाली. त्यातच, भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले असल्याचे म्हटले. त्यानंतर, माध्यमांतून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचं नाव पुढे आल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही ट्विट करत, राष्ट्रवादी काँग्रेस या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष कुणीही पाटील असावा, पटेल नसावा असे म्हणत भूमिका मांडली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही जोरदारपणे भूमिका मांडली. त्यानंतर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. आता, त्यावर, शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी भूमिका मांडली. मुलाखतीत पियुष गोयल यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांचं अनवधानाने नाव आल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं. त्यानंतर, आता भरत गोगावले यांनी यावरुन सुनील तटकरेंना टोला लगावला आहे. अनावधानाने नाव येतचं कसं? असे म्हणत मंत्री गोगावले यांचे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्यावरुन सुनील तटकरेंना टोला लगावला. रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.

राजकारण किळसवाणं झालं आहे-रोहित पवार

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आणि दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण यावरुन विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. विलीनीकरणाची चर्चा झाली होती असा दावा शरद पवार गटाचे नेते करत आहेत. तर, अजित पवार गटाचे नेते हा दावा खोडून काढत आहेत. अशात राष्ट्रवादी (शरद पवार) चे आमदार रोहित पवार यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणापुढे माणसाच्या जिवाची किंमत शून्य झाली आहे’, अशा शब्दात रोहित पवार यांनी सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली आहे. राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद झालंय असं सांगताना राजकारणापुढं माणसाच्या जिवाची किंमत अक्षरश: शून्य झालीय, असे रोहित पवारांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. “छक्के – पंजे करता येणं हाच राजकारणचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरचं राजकारणात रहावं का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही”, अशा शब्दात रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.