Raj Thackeray-Uddhav Thackeray Victory Rally : राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर आज शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने जल्लोष साजरा करण्यासाठी मुंबईत विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे अवघ्या महाराष्ट्राच लक्ष याकडे लागलं होतं. या मेळाव्यात बोलताना मनसे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संकेत दिले आहेत.

दरम्यान, या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. या टिकेनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत थेट सूचक इशाराच दिला आहे. ‘आम्ही फ्लॉवर की फायर आहोत हे पुढच्या निवडणुकीत दिसेल’, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच तीन वर्षांपूर्वी फक्त अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला होता तरी ते अद्याप सावरले नाहीत, असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“खरं म्हणजे तीन वर्षांपूर्वी धो डाला अब उठेगा नहीं साला, हा डायलॉग उद्धव ठाकरे यांनाच शोभून दिसतो. मी तीन वर्षांपूर्वी अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला होता तरी ते आडवे झाले आणि अजून सावरले नाहीत. आता उद्धव ठाकरे कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अशा प्रकारचं बोलणं शोभत नाही. त्यासाठी मनगटात जोर लागतो, फक्त बोलून काही होत नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

“आता एवढंच सांगतो की मेळाव्यात एकाने मराठीबाबतची तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते. मेळाव्यातील एका वक्ताने ते पाळलं, तर दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा आजेंडा बोलून दाखवला. उद्धव ठाकरेंच्या भाषणात एक जळजळ आणि मळमळ होती हे दिसून आलं. मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला? मुंबईतील मराठी माणसांचा टक्का का कमी होत गेला? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकाच्या भाषणात मराठीची तळमळ दिसली आणि दुसऱ्याच्या भाषणात सत्तेसाठी मळमळ होती ती दिसली. हा दोन्हीमधला फरक आहे. उद्धव ठाकरे माझ्यावर कायम टीका करतात. मात्र, मी त्यांच्या टीकेला कामाने उत्तर देतो. कामामधून उत्तर दिलं म्हणून आम्हाला लोकांनी पुन्हा कौल दिला. मी २०२२ ला अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला होता तेव्हा ते आडवे झाले, अद्याप सावरलेच नाहीत. आता ते कोणाचातरी हात धरून उठण्याचा प्रयत्न करत आहेत. तीन वर्षांपूर्वी अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला होता, जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय झालं असतं? याचा विचार करावा, उद्धव ठाकरे काय म्हणाले की फ्लॉवर की फायर? हे त्यांना पुढच्या निवडणुकीत कळेल”, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.