Eknath Shinde On Ladki Bahin Yojana Update : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या विविध शहरांत सभा, मेळावे आणि बैठका सुरू आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळी नागरिकांना अनेक आश्वासने देत आहेत. या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाटकोपरमध्ये सभा पार पडली.
या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठं आश्वासन दिलं आहे. लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या १५०० रुपयांमध्ये लवकरच वाढ केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
“घाटकोपरमध्ये क्लस्टर योजनेतील प्रत्येक कुटुंबाला हक्काचं घर देण्याचं काम केलं जाईल. कारण क्लस्टर योजना आम्ही त्यासाठी आणली आहे. त्यामध्ये आम्ही पात्र आणि अपात्र अशी भानगड ठेवली नाही. जेवढे लोक राहतात, त्या सर्वांना घरं देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलं जाईल. त्यासाठी नगरविकास विभाग पैसे कमी पडू देणार नाही”, असं शिंदे म्हणाले.
“आता लाडकी बहीण योजना सुरू आहे का? आहे ना? सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली, आता कोणी आलं आणि काहीही बोललं तरीही ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळतात, आपण आता ते देखील वाढवणार आहोत. आम्ही आमच्या वचननाम्यात जे बोललो ते आम्ही करणार, लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायांवर उभं करणार, लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची गोड बातमी!
भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत माहिती देताना गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलासा देणारी ही मोठी भेट ठरेल. येत्या १४ जानेवारीपूर्वी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये जमा होणार आहेत. राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ही रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग केली जाणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
