Uddhav Thackeray faction MPs joining Shinde Sena Update: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची सगळीकडेच कुजबूज सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतल्या मातोश्री या निवासस्थानी आपल्या पक्षातील खासदारांची बैठक घेतली. या बैठकीला चार खासदार अनुपस्थित असल्याचे सांगितले जात होते. यादरम्यान बैठक संपल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रत्यक्ष बैठकीत कोण उपस्थित आणि कोण गैरहजर होते, याबाबत सविस्तर माहिती दिली.
ठाकरे गटाच्या बैठकीला कोण गैरहजर?
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, अनिल देसाई, राजाभाऊ वाझे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. उर्वरित पाच खासदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीला हजेरी लावली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव हे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असल्याने ओमराजेंनी रुग्णालयातूनच बैठकीला हजेरी लावली. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी असल्याने त्यांनी शिर्डीच्या रुग्णालयातूनच बैठकीत सहभाग घेतला. त्याशिवाय हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांचे चिरंजीव हे विधानपरिषदेच्या निवडणुकीला उभे असल्यामुळे आष्टीकरांनीही या बैठकीत ऑनलाईन पद्धतीनेच हजेरी लावली, तर वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या घरी मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असल्याने त्यांना मुंबईत येता आले नाही. त्यामुळे तेदेखील ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
ऑपरेशन टायगरबाबत राऊत काय म्हणाले?
शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता, आमच्या पक्षाचे सर्व खासदार बैठकीला उपस्थित होते आणि कोणीही फुटणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दर महिन्याला शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची बैठक घेत असतात. पुढील महिन्यातही पुन्हा अशीच एक बैठक होईल. आजच्या बैठकीला जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत ते येत्या दोन-तीन दिवसांत स्वतः मातोश्रीवर येऊन पक्षप्रमुखांची भेट घेतील, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. यांनी सांगितले. दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनीही माध्यमांशी संवाद साधताना आपल्या पक्षाचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चांचे खंडन केले. ऑपरेशन टायगरच्या चर्चेत काही तथ्य दिसत नाही आणि लोकसभा निवडणुकीपासूनच कायम ही चर्चा होत आली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मुलाची तब्येत बरी नाही. त्यामुळे ते रुग्णालयाच्या कामात व्यस्त होते, त्यांनी पक्षप्रमुखांना त्याबाबतची कल्पनाही दिली होती, असा खुलासा कैलास पाटील यांनी केला. तसेच, २०२२ मध्ये एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना साथ द्यायची अशी आमची भूमिका होती आणि यापुढेही हीच भूमिका असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन टायगरची चर्चा कशामुळे रंगली?
ठाकरेंचे खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची व काही दिवसांत ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मागील काही महिन्यांत ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांनी एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मागील काही महिन्यांत संजय दीना पाटील हे शिंदे यांच्यासोबत एकाच कारने प्रवास करताना आढळून आले होते. खासदार राजाभाऊ वाजे हे तर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत एका मंचावर दिसले होते. तर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यातच शिंदेसेनेचे नेते व राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या राजकीय हालचालींबाबत बोलताना ‘आगे आगे देखो होता है क्या ’ असे हिंदीमध्ये म्हणत ‘ऑपरेशन टायगर’ च्या चर्चेस ९ एप्रिल रोजी गती दिली होती. “शिवसेनेमध्ये येणाऱ्यांचे ‘इनकमिंग’ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सध्या कोणतीही निवडणूक नसली तरी, सामान्य कार्यकर्त्यांपासून ते आमदार, खासदार आणि माजी मंत्र्यांपर्यंत अनेकांचा ओढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाकडे आहे,” असे ते म्हणाले होते.
“…तर आम्ही ऑपरेशन लांडगा करू”
दरम्यान ते ऑपरेशन टायगर करणार असेल तर आम्ही ऑपरेशन लांडगा करू असे संजय राऊत म्हणाले. या बैठकीसंदर्भात ते काल म्हणाले होते, उद्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक मातोश्रीवर आहे. अशी बैठक म्हणजे कोणत्याही पक्षात सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. अशा बैठका मातोश्रीवर सातत्याने होत असतात. पुढच्या महिन्यात लोकसभेचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे उद्या सगळ्या नऊ खासदारांना बोलावून उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ करणार असे जे म्हणतात त्यांचे ऑपरेशन अमित शाह यांनी शंभरवेळा केलं आहे. माणसं फोडणं ही एक प्रकारची विकृती आहे. जेव्हा पासून या देशात मोदी-शाहांचं राज्य आलंय तेव्हापासून या विकृतीने कळस गाठला आहे. महाराष्ट्रासारखे राज्यसुद्धा त्यांनी नासवले आहे. योग्यवेळी राज्यात आणि देशात या विकृतीविरोधात जनता बंड करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा संतापही राऊत यांनी व्यक्त केला होता.
