Eknath Shine On Operation Tiger: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या सेनेला खिंडार पाडून सहा खासदारांना पक्षात घेतले. यानंतर काही दिवसांतच सचिन अहिर यांना देखील पक्षात घेऊन विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी संधी दिली. या राजकीय घडामोडींनी राज्यात चांगलीच खळबळ उडवून दिली. यानिमित्ताने शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरची चांगलीच चर्चा झाली. शिंदेंची शिवसेना पुन्हा ऑपरेशन टायगर करण्याच्या तयारीत आहे का? याबाबत स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
ऑपरेशन टायगरबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा इन्फ्रा व्हिजन कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांना ऑपरेशन टायगरबाबत प्रश्न विचारण्यात आला. ऑपरेशन टायगर सध्या किती वेगाने पुढे सरकतंय? त्याचा गिअर कोणता आहे? या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदेंनी, “समृद्धी महामार्गाला १५ किलो मीटर प्रतितासचा वेग दिला आहे. अधिकृत १५० चा आहे, आम्ही १२० ठेवला आहे पण त्याचं डिझाईन १५० चं आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही राज्यात महायुतीत तर देशात एनडीएमध्ये आहोत”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणून कधी वागलो नाही – एकनाथ शिंदे
“पक्ष मजबूत केव्हा होतो? कार्यकर्ते, संघटना यामुळे पक्ष मजबूत होतो. तसेच, काम केल्यामुळे, लोकांमध्ये गेल्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवल्यामुळे पक्ष मजबूत होतं. पक्षाची ध्येयधोरणं काय आहेत हे बघून लोकं पक्षात येत असतात. अडल्या नडल्याच्या मागे पक्ष, नेता उभा राहतो तेव्हाच लोक येतात. मी मुख्यमंत्री असताना लोकांमधीलच होतो. मुख्यमंत्री म्हणून कधी वागलो नाही, कॉमनमॅन म्हणून वागलो. मुख्यमंत्री म्हणजे कॉमनमॅन, त्यामुळे मी लोकांमधीलच आहे”, असे शिंदे पुढे म्हणाले.
छोटी मोठी ऑपरेशन सुरु असतात – एकनाथ शिंदे
“ऑपरेशन टायगरनंतर आमचा स्पीड सगळ्यांना कळालाच, यानंतर जेव्हा केव्हा काही होत राहिल तेव्हा कळत राहिल”, असे एकनाथ शिंदे म्हणाले. दसऱ्याच्या सीमोल्लंघना चर्चांबाबत बोलताना दसरा मेळावा होईलच असे सांगितले. तसेच, “२०२२ ला आम्ही ऑपरेशन केले. ऑपरेशन करायला मी डॉक्टर नाही. डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन सुरु असतात”, असेही पुढे बोलताना शिंदे म्हणाले.
