सावंतवाडी : “सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, रोजगार निर्मिती, पर्यटन वाढ, शेतकरी-बागायतदारांचे प्रश्न आणि लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपण प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

​कुडाळ येथे आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या महायुती प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजू परब, दत्ता सामंत आणि महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

​उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना, भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम महायुती खासदार नारायण राणे यांनी जाहीर केली आहे. या महायुतीचे २५ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत, ही विजयाची नांदी आहे. जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणे १०० टक्के निश्चित असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावाही त्यांनी केला. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद भक्कमपणे कार्य करेल, असेही त्यांनी नमूद केले.

​विकासकामांचा ‘स्पीड ब्रेकर’ काढला:

​आपल्या कार्यकाळाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कामांना स्थगिती देण्याचे राजकारण केले नाही, तर विकासाचा स्पीड ब्रेकर काढून प्रकल्पांना गती दिली. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी टीका केली, पण ही योजना आजही सुरू आहे आणि भविष्यातही सुरूच राहील. आता २१०० रुपये देण्याची घोषणा केली असून ती आम्ही योग्य वेळी पूर्ण करू.”

​रोजगार आणि पर्यटनावर भर:

​जिल्ह्यातील तरुणांच्या स्थलांतराचा मुद्दा अधोरेखित करत उपमुख्यमंत्री म्हणाले की, सिंधुदुर्गातील तरुणांना नोकरीसाठी मुंबई-ठाण्याला जावे लागू नये, यासाठी जिल्ह्यात ‘स्किल सेंटर’ उभारले जातील. पर्यटनाला चालना देऊन स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला जाईल. केंद्रानेही बजेटमध्ये कोकणातील नारळ आणि काजू बागायतदारांचा विचार केला असून, राज्य सरकार यात कोणतीही कमतरता भासू देणार नाही.

​लाडक्या बहिणींना बनवणार उद्योजिका:

​”केवळ १५०० किंवा २१०० रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. लाडक्या बहिणींनी स्वतःचे छोटे-मोठे व्यवसाय करून आत्मनिर्भर व्हावे आणि कुटुंबाला हातभार लावावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना बळ दिले जाईल,” असे शिंदे यांनी सांगितले.

​या सभेदरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनीही मनोगत व्यक्त करत महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.