Eknath Shinde : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. महाविकास आघाडीने आम्हाला १८० जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका असं बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आता एकनाथ शिंदे यांनी महायुतीला किती जागा मिळतील ते सांगितलं आहे. महाराष्ट्रात प्रचार सुरु झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेलिग्राफला जी मुलाखत दिली त्यात महायुतीला किती जागा मिळतील? हे सांगितलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आमच्याकडे खरी शिवसेना आहे, तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हही आमच्याकडे आहे. लोकसभेत जी लढाई झाली त्यात शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट आणि शिवसेना यांच्यात १३ ठिकाणी लढत होती. त्यातल्या सात जागा आम्हाला मिळाल्या असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, योगी आदित्यनाथ यांनी सांगितलेलं हे वाक्य योग्यच आहे. एक व्हा आणि मतदान करा असंच त्यांना सांगायचं आहे. त्यात वावगं काही नाही असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

हे पण वाचा- Photos : फडणवीसांची इच्छाशक्ती, अश्विनी भिडेंची नियुक्ती ते कमी चेंडूत जास्त धावा, एकनाथ शिंदेंचे १० महत्त्वाचे वक्तव्ये

आम्ही सत्ता सोडून विरोधी बाजूने गेलो

आम्ही सत्ता सोडून विरोधी बाजूने गेलो, काय होईल ते माहीत नव्हतं. ज्यांनी काँग्रेसबरोबर युती केली आणि महाविकास आघाडी स्थापन करुन बाळासाहेब ठाकरेंचे विचार धुळीला मिळवले अशा लोकांबरोबर आम्ही थांबलो नाही. पदासाठी नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासाठी आम्ही त्या सत्तेतून बाहेर पडलो आणि बंड केलं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीने अडीच वर्षांत केलेलं काम आणि महायुतीने दोन ते सव्वादोन वर्षांत केलेलं काम याचा आढावा घेतला तरीही तुम्हाला फरक लक्षात येईल असं एकनाथ शिंदे म्हणाले. सगळ्या गोष्टी बंद पाडणं हे महाविकास आघाडी सरकारचं काम होतं. तर सगळ्या गोष्टींना गती देणं हे काम आमच्या सरकारने करुन दाखवलं असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीला किती जागा मिळणार?

महायुतीला किती जागा मिळतील हे विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या १७० जागा तरी येतील असा विश्वास मला आहे. कारण लोकांचं प्रेम, लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे आम्हाला चांगलं यश मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.