Eknath Shinde on MNS Support: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला (शिंदे) पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना (शिंदे) भाजपाला बाजूना ठेवून स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा होती. तसेच भाजपाला अंधारात ठेवून मनसेला बरोबर घेतल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होती. यावर आता उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे) अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना एकनाथ शिंदे यांनी केडीएमसीसह राज्यातील विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.

मनसेने पाठिंबा का दिला?

मनसेच्या पाठिंब्याबाबत बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मनसेने कल्याण-डोंबिवलीमधील विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. यापूर्वीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे पक्ष आमच्याबरोबर (महायुती) होता. भाजपा आणि शिवसेनेची (शिंदे) युती आजची नाही. या युतीत आता मनसेचाही सहभाग झाला आहे. आम्ही महायुतीतच सत्ता स्थापन करणार आहोत.”

शिवसेनेचे (ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंची सत्ता स्थापन होण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या सेनेने पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. यावरही एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही. मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये भाजपा आणि शिवसेना (शिंदे) अशी महायुतीचच सत्ता स्थापन होणार आहे.”

दोन ठाकरेंपैकी कुणाचा फायदा-तोटा, हे जगजाहीर

निवडणुकीत कुणाचा फायदा झाला आणि कुणाचा तोटा झाला, हे निकालातून दिसले आहे. या युतीपासून फायदा आणि तोटा कुणाचा झाला, हे आपण पाहतच आहोत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसेच राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेबाबत जी भूमिका मांडली त्यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

ते म्हणाले, “राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट मी वाचली. त्यांनी म्हटले, मी वैयक्तिक फायदा पाहून कधीही निर्णय घेत नाही, घेणार नाही. राज ठाकरे यांनी कधीही वैयक्तिक फायदा पाहिलेला नाही. त्यांनी नेहमीच व्यापक भूमिकेतून निर्णय घेतले आहेत. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला होता. विधानसभेलाही आम्हाला समर्थन दिले होते. राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करतात, आता बाकी लोक काय करतात? हे सर्वांना माहितीच आहे.”