CJP ने ३६ दिवस जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला यश आलं आहे. कारण देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अखेर २५ जुलैला झाला आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीने हे आंदोलन सुरु केलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह त्यांच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचा जल्लोष पाहण्यास मिळाला. यानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांची राहुल गांधींवर जोरदार टीका

“विद्यार्थ्यांचे हे आंदोलन पूर्णपणे बिगर राजकीय होते, मात्र काही राजकीय लोकांनी त्यात स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. काही लोक थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करत होते, याचा अर्थ पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ घातपात घडवण्याचाच त्यांचा हेतू होता. राहुल गांधी इतरांना ‘इकडे या, इकडे या’ म्हणून चिथावणी देत होते. आंदोलन जंतर-मंतरवर सुरू असताना पंतप्रधानांच्या निवासस्थानी का बोलावलं जात होतं? देशात अराजकता पसरवणे हाच विरोधी पक्षनेत्याचा मुख्य हेतू होता आणि मी या प्रकाराचा तीव्र निषेध करतो.” अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार केला-एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, नीट पेपरफुटी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, मात्र या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने योग्य पावले उचलली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात लोकसभेत नवीन कठोर विधेयक आणणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या गुन्ह्यातून कोणाचीही सुटका होणार नाही आणि पेपरफुटीवर कठोर कारवाई होईलच, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या भावनांना आणि देशाच्या भवितव्याला पंतप्रधान मोदींनी प्राधान्य दिलं असं सांगत शिंदेंनी त्यांचे आभार मानले. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांचे कौतुक केलं.

महाराष्ट्राने नाकारलेले नेते दिल्लीत गेले होते-एकनाथ शिंदेंचा टोला

माध्यमांशी संवाद साधत असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोलेबाजी केली. उपमुख्यमंत्री म्हणाले की, “ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने नाकारलं आहे, ते दिल्लीत जाऊन विद्यार्थ्यांना भडकावण्याचे काम करत होते. आता विद्यार्थ्यांनी स्वतःहून आपले आंदोलन यशस्वीपणे मागे घेतल्यानंतर या नेत्यांची मोठी निराशा झाली आहे.” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.