Eknath Shinde PM Modi Pakistan Photo Crop reaction: “पाकिस्तानने पंतप्रधान मोदींचा फोटो कापून आपली पातळी दाखवून दिली आहे. पण पंतप्रधान मोदी यांनी मनात आणले तर ते पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून हटवू शकतात”, असे प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एएनआयशी बोलताना दिली.
किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेनंतर फोटो क्रॉपचा मुद्दा चर्चेत आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने परिषदेत उपस्थित राहिलेल्या जागतिक नेत्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो क्रॉप केला होता. त्यावरून आता भारतात प्रतिक्रिया उमटत असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर संताप व्यक्त केला.
प्रकरण काय?
बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत सहभागी झालेल्या सर्व देशांच्या प्रमुखांचे एकत्र फोटोसेशन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने सर्वांचा एकत्रित फोटो आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान मोदींसह इतर काही देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा फोटो कापून सोशल मीडियावर पोस्ट केला. पाकिस्तानच्या या हास्यास्पद कृतीवर आता टीका होत आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलत असताना शिंदे यांनी संताप व्यक्त केला. “पाकिस्तानचे कृत्य दुर्दैवी आहे. पाकिस्तानकडून अशाप्रकारची कृत्ये अनेकदा झाली आहेत. त्यांनी फक्त फोटो हटवला. पण पंतप्रधान मोदींनी मनात आणले तर ते जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला हटवू शकतात”, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.
#WATCH | Delhi: On Pakistan PMO cropping PM Modi out of SCO group photo, Maharashtra Deputy CM Eknath Shinde says, "What Pakistan has done is extremely unfortunate. Pakistan has always attempted such things. However, I would say that while they may have removed Modi Ji’s… pic.twitter.com/7omXR9LVEJ
— ANI (@ANI) September 1, 2026
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “पहलगाममध्ये पाकिस्तनने भ्याड हल्ला केला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आमच्या सैन्यदलाने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. ११ हवाई तळ उडवले. पाकिस्तानला हात टेकण्यास पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याने भाग पाडले. यामुळे पाकिस्तानने आमच्याशी आगळीक करण्याचा कधीही प्रयत्न करू नये. फोटो हटविण्यासारखे हीन कृत्य केले तरी देशातील १४० कोटी जनतेच्या मनातून ते पंतप्रधान मोदींना काढू शकत नाहीत.”
‘पंतप्रधान मोदी लोकप्रियेतमध्ये प्रथम क्रमांकावर’
“पंतप्रधान मोदी लोकप्रियतेमध्ये प्रथम क्रमाकांवर आहेत. नुकतेच त्यांना उझबेकिस्तानने त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. एकूण ३६ देशांनी त्यांचा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदींना देऊन गौरव केला आहे. पाकिस्तानने फोटो क्रॉप करण्याचे कृत्य करून स्वतःवर नामुष्की ओढवून घेतली आहे”, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
