गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेना (ठाकरे) पक्षामधून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या या संदर्भातील वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संजय दिना पाटील यांच्या या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार संजय दिना पाटील यांचा पत्रकारांबद्दल असं बोलण्याचा कोणताही हेतू नव्हता, असं मला त्यांनी सांगितलं. पण तरीही मी त्यांना याबाबत पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“मी या सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती घेतो आणि पुन्हा बोलतो. मात्र, मी आताच खासदार संजय दिना पाटील यांच्याशी बोललो. त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या की, पत्रकारांबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी कोणतीही भावना नव्हती. माझे आणि पत्रकारांचे संबंध चांगले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असं मला संजय दिना पाटील यांनी सांगितलं आहे”, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
‘…तर पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करा’
“जे दररोज त्यांच्या विरोधात बोलतात, रोज त्यांच्याबाबत अपशब्द बोलतात. तोडून टाका, मारून टाका, तुडवा, अशा पद्धतीने खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात, मग तो देखील मीडियाचा अपमान आहे. किती दिवसांपासून काय-काय बोलतात ते आपण पाहिलं आहे. याचाच राग संजय दिना पाटील यांच्या मानामध्ये आहे. मात्र, पत्रकारांच्या बाबतीत संजय दिना पाटील यांच्या मनामध्ये कुठलाही राग नव्हता. पत्रकारांच्या बाबतीत अशा प्रकारचं वक्तव्य कोणत्याही लोकप्रतिनिधीने करू नये. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडून जर पत्रकारांना काही शब्द गेले असतील तर पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करावी”, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांना दिला आहे.
संजय दिना पाटील यांनी काय वक्तव्य केलं होतं?
“रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे, कमिशनरकडे जाऊन तक्रार करा. तुमची इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला गां## घुसताय. अरे कोणत्याही गोष्टीची लिमिट असते. सांगितलं ना सर्व. त्याने काही बोलूदे. तुझ्या आ## ### गेलं, आणि आता माझ्याकडे येऊ नका. माझ्याकडे काही घ्यायला आला तर मारणार. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आलात तर मार खाणार”, अशा भाषेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली असल्याचा आरोप करण्यात आला होता.
