Eknath Shinde Reaction Pawanraje Nimbalkar Case: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील, काँग्रेसचे माजी नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल २० वर्षांनी लागला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने या खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यानंतर यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी सदर निकालानंतर उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले. तसेच शिंदे गटात जाण्याचा अंतिम निर्णय झाला नसून त्याबाबत मतदारसंघातील लोकांशी बोलून ठरवू, असे म्हटले. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये आले होते. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याच्या १४४५.९७ कोटीच्या कामाचा पायाभरणी समारंभ पार पडला. या समारंभानंतर एएनआयशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पवनराजे निंबाळकर खटल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, २० वर्षांपासून सीबीआय न्यायालयात हा खटला सुरू होता. या हत्याकांडात पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची हत्या झाली होती. अतिशय गंभीर अशी ही घटना होती. निंबाळकर कुटुंब आणि आम्हाला असा विश्वास होता की, या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होईल. पण दुर्दैवाने सर्व आरोपी निर्दोष सोडण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.
शिंदे पुढे म्हणाले, “या निकालानंतर मी स्वतः आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यांना या खटल्याची माहिती दिली. त्यांनी सदर प्रकरण सीबीआय उच्च न्यायालयात घेऊन जाईल, असा शब्द दिला आहे. तशाप्रकारचे निर्देशही त्यांनी सीबीआयला दिले आहेत. उच्च न्यायालयात या प्रकरणी नक्कीच न्याय मिळेल.”
“निंबाळकर कुटुंबाला न्याय मिळायला हवा, अशी आमची भावना आम्ही अमित शाह यांच्यासमोर व्यक्त केली. हे हत्याकांड गंभीर होते. पण दुर्दैवाने न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडले, त्यामुळे सीबीआय आता उच्च न्यायालयात जाईल”, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
ओमराजे निंबाळकरांचा शिंदे गटात प्रवेश होणार?
वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर राजकीय निर्णय घेऊ, असे विधान ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र आजचा निकाल निंबाळकर कुटुंबाच्या विरोधात गेल्यामुळे ते काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज निकालानंतर वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी मतदारंसघात जाऊन सर्वांशी चर्चा करेल आणि त्यानंतर निर्णय घेईल. माझा अंतिम निर्णय झालेला नाही. या खटल्याचा आणि माझ्या त्या निर्णयाचा काहीही संबंध नव्हता. मला मतदारसंघातील लोकांची भावना जाणून घ्यायच्या आहेत.”
ऑपरेशन टायगरचे काय?
शिवसेनेचे (ठाकरे) नऊपैकी सहा खासदार बंडखोरी करत वेगळा गट स्थापन करतील, असे बोलले जात होते. पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी संसदीय पक्षाच्या दोन तृतीयांश सदस्यांनी वेगळ्या गटाला मान्यता देणे गरजेचे आहे. मात्र आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपला निर्णय बदलला तर पाच खासदारांना वेगळा गट स्थापन करता येणार नाही. जर तसा प्रयत्न केला, तर पाच खासदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे या प्रकरणातील तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे ओमराजे निंबाळकर कोणता निर्णय घेतात, यावर ऑपरेशन टायगरचे भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.
