Eknath Shinde : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या परभणी महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना ठाकरे सेनेचे सय्यद इकबाल खाजा विराजमान झाले. परभणीत मुस्लिम नगरसेवकांची अधिक संख्या लक्षात घेऊन शिवसेना पक्षाने मुस्लिम चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला. याबाबत प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा खरा चेहरा आता समोर आल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे.
परभणीत गुरुवरी झाली निवडणूक
परभणीत महापौरपदासाठी गुरूवारी निवडणूक संपन्न झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काम पाहिले. शिवसेना-काँग्रेसकडे बहुमत असल्याने दोन्ही पक्षांच्या आघाडीने सत्ता स्थापन केली. त्या अनुषंगाने परभणीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नगरसेवकांच्या मतानुसार महापौर म्हणून सय्यद इकबाल खाजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत महापौर म्हणून शिवसेना मुस्लिम चेहरा देणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. सय्यद इक्बाल खाजा यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. दरम्यान एकनाथ शिंदेंनी या निमित्ताने त्यांचा (उद्धव ठाकरे) खरा चेहरा समोर आल्याचं म्हटलं आहे.
परभणीच्या निमित्ताने त्यांचा खरा चेहरा समोर आला-एकनाथ शिंदे
२०१९ लाच त्यांनी (उद्धव ठाकरे) बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, त्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. राज्याचा विकास आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही पुढे नेत आहोत.विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये आम्हाला कौल दिला आहे. २०१९ ला त्यांनी जी भूमिका घेतली आता परभणीत त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
परभणी महापालिकेत भाजपा विरोधात बसणार
परभणी महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ३४ नगरसेवकांची गरज होती. काँग्रेस आणि शिवसेनेकडे एकूण ३७ नगरसेवकांचे पाठबळ होते. तसेच एक अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या एका सदस्याने देखील सेना-काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवाराला मतदान केले. भाजपानेही सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. मात्र नगरसेवकांचं गणित जुळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला.

