Uddhav Thackeray Answer to Eknath Shinde : विधानपरिषदेतल्या ९ सदस्यांचा निरोप समारंभ मंगळवारी विधानपरिषदेत पार पडला. या नऊ सदस्यांमध्ये उद्धव ठाकरेंचाही समावेश होता. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना निरोप देताना त्यांचा उल्लेख साहेब असा केला. उद्धव ठाकरेंनीही विविध मुद्द्यांना स्पर्श करत टोलेबाजी केली. दरम्यान एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी त्यांना उत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आपले सदस्य निवृत्त होत आहेत. कधी कधी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होतात. पण आपण आज हळव्या वळणावर आलो आहोत. नऊ सदस्य आहेत, ज्यात उद्धव ठाकरे साहेब आहेत. उद्धव ठाकरे साहेब आज निवृत्त होत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, राजेश राठोड देखील आज निवृत्त होत आहेत. राजेशजी शांत व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ग्रामीण भागातील विकास याकडे आपला कायम भर असतो. सभागृहात विरोधकांची गरज असते तेव्हा राजेश राठोड यांच योगदान देखील असतं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. निरोपाचा सण नाही, तुमच्या भेटीसाठी आतुर हे मन आहे, तुमच्या भेटीची आस पु्न्हा आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा नामोल्लेख टाळत उत्तर दिलं.
उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे?
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, मुख्यमंत्रीजी मी जेव्हा सभागृहात आलो, तेव्हा तुमच्या आधी काहीजण बोलत होते ते मी थोडं ऐकलं, की कुठेतरी भेटू…मी तुम्हाला (देवेंद्र फडणवीस) थोड्यावेळाने भेटायला येणार आहे. पण काहीजणांना रणांगणात, काहीजणांना कुठे…आणि काहीजणांना असं वाटतं की आता इथे भेटलात..(हात जोडून), असे काही लोक आहेत. असो…या सभागृहात मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्यासोबत इतर सदस्य देखील निवृत्त होत आहेत, त्यांना देखील शुभेच्छा देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा नामोल्लेख टाळत असं उत्तर दिलं आहे.
विधान परिषदेच्या कुठल्या सदस्यांचा कार्यकाळ संपला?
१) उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
२) नीलम गोऱ्हे (शिवसेना)
३) शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
४) अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
५) गोपीचंद पडळकर (भाजपा)
६) रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजपा)
७) राजेश राठोड (काँग्रेस)
८) प्रवीण दटके (भाजपा)
९) रमेश कराड (भाजपा)
