कर्जत: शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉ. गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या शिर्षकावरून प्रकाशकांना धमकावल्या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिंदे गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार गायकवाड यांना समज दिल्याचे सांगितले आहे. गायकवाड यांनी माफी मागितल्यामुळे आता हा प्रश्न संपला आहे असेही उपमुख्यमंत्र्यी म्हणाले आहेत.

‘गोदा ते नर्मदा या जलयात्रेची सुरुवात आज, शनिवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी आमदार गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी गायकवाड यांनी माफी मागितली आहे आणि त्यांना समज दिली आहे, असे सांगत विषय संपवला व अधिक बोलणे टाळले.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केवळ जलयात्रेवरच अधिक बोलणे पसंत केले. शिंदे यांनी ‘पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश देत अहिल्यादेवींच्या कार्याची आठवण करून दिली. ‘जन्मभूमी ते कर्मभूमी’पर्यंत जाणारी ही जलयात्रा राज्यात पाण्याबाबत मोठी जनजागृती घडवेल. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.

‘गोदा ते नर्मदा’ उपक्रमाचे नियोजन केल्याबद्दल माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले. जलसंवर्धन ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे जनतेमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

कार्यक्रमस्थळी ढोल-ताशांचा गजर, जनसमुदाय आणि जलसंवर्धनाच्या घोषणा यामुळे वातावरण भारावून गेले होते. या यात्रेत स्थानिक नागरिक, शेतकरी, महिला आणि युवकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. जलसंवर्धनाबाबत व्यापक जनजागृती करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले.