“आता मी मुख्यमंत्री, ‘तपासून सादर करा’ ही लिखापडी बंद, थेट जिल्हाधिकाऱ्यांना…”; एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

“आता मी मुख्यमंत्री झालो आहे. त्यामुळे यापुढे आमदारांच्या पत्रांवर तपासून सादर करा अशी लिखापडी बंद करणार आहे,” असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

Eknath Shinde Devendra Fadnavis Cabinet meeting
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

“आता मी मुख्यमंत्री झालो आहे. त्यामुळे यापुढे आमदारांच्या पत्रांवर तपासून सादर करा अशी लिखापडी बंद करणार आहे,” असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. तसेच यापुढे आमदारांसमोरचे लगेच थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून कार्यवाही करा, असे आदेश देणार असल्याचंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं. ते सोमवारी (४ जुलै) आपल्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदनपर भाषणात विधानसभा अधिवेशनात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आता या आमदारांचा हक्काचा माणूस आला आहे. ते माझ्याकडे पत्र घेऊन येतात. ते म्हणतात यावर लिहा. मी म्हणतो आता लिहायचं नाही, थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करतो आणि काम करायला सांगतो. विषय संपला. लिखापडी बंद, त्यात वेळ जातो. तपासून सादर करा यात खूप वेळ जातो. आता थेट कार्यवाही करा. तरच आमचे २०० आमदार होणार आहेत.”

“मी ना कधी माड्या बांधल्या, ना मोठे फाईव्ह स्टार हॉटेल बांधले”

“आपल्याला व्यवस्था बदलावी लागेल. या सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे. शेवटच्या घटकांपर्यंत या योजना पोहचल्या पाहिजेत. जयंत पाटील यांच्या जलसंपदाचं, छगन भुजबळ अशा सर्वांची कामं करुयात. शेवटी लोकांचंच काम करायचं आहे. हे कुठं आपलं खासगी काम आहे. मला तर व्यक्तिगत स्वार्थ नाहीच. मी ना कधी माड्या बांधल्या, ना मोठे फाईव्ह स्टार हॉटेल बांधले किंवा संपत्ती घेतली नाही. माझं काहीच नाही. माझं काही आहे का जितेंद्र आव्हाड यांनी सांगावं,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

“प्रत्येक आमदाराकडे स्वतःचे १-२ हजार दबंग कार्यकर्ते”

एकनाथ शिंदे यांनी गद्दार म्हणणाऱ्यांनाही सूचक इशारा दिला. ते म्हणाले, “रोज तुम्ही शिवसैनिकांना आमच्याविषयी गद्दार गद्दार असं सांगता. आता काय आमचे पोस्टर वगैरे जाळून झाले आहेत. आता कोण जाळत नाही. आम्ही त्यावर कोठेही प्रतिक्रिया दिलेली नाही. शेवटी आम्ही ५० आमदार आहोत. प्रत्येकजण ७० हजार, ८० हजार, १ लाख, दीड लाख अशी मतं घेऊन निवडून आले आहेत. प्रत्येकाकडे स्वतःचे हजार दोन हजार लोक आहेत. ते सर्व कार्यकर्ते दबंग आहेत, पण आम्ही ते शस्त्र बाहेर काढलं नाही. कोणाशी लढायचं?”

हेही वाचा : “…तर माझ्यामागे ईडी लागेल”; ‘अबतक छप्पन’ म्हणत काँग्रेस आमदाराची मतमोजणीतच राजकीय टोलेबाजी

“आम्ही कधीही रक्तपात होऊ देणार नाही”

“भास्कर जाधव यांना मी सांगू इच्छितो की आम्ही कधीही रक्तपात होऊ देणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. मात्र, एका मर्यादेपेक्षा सहनही करता येत नाही. मी मुख्यमंत्री आहे म्हणून माझ्या डोक्यात हा कधीही विचार येणार नाही. मी अजूनही आमच्या लोकांना सांगतो की मी मुख्यमंत्री झालोय हे मलाच अजून माहिती नाही. मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही ५० लोक आहात नाही, सगळेच मुख्यमंत्री आहात. उरलेले ११५ आमदार हे देखील मुख्यमंत्री आहेत,” असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde say now onwards no remarks on letters direct order to collector in assembly session pbs

Next Story
“काही गोष्टी आम्ही उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्या होत्या, त्यावर त्यांनी…”; अजित पवारांचं वक्तव्य
फोटो गॅलरी