मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकार थोडं आधीच यायला हवं होतं असं सर्वांना वाटत असल्याचं वक्तव्य केलं. तसेच हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. हे पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारं सरकार आहे. या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देणारं सरकार आहे, असंही नमूद केलं. ते मंगळवारी (३० ऑगस्ट) कुलाबा-वांद्रे-सिप्स मेट्रो लाइन-३ च्या प्रोटोटाईप ट्रेन चाचणी शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. हे पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारं सरकार आहे. या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देणारं सरकार आहे. त्यामुळे सर्वांना वाटतं हे सरकार थोडं आधीच यायला हवं होतं. पण ठीक आहे योग जुळून येण्याच्या काही गोष्टी असतात. लोकांच्या मनातील शिवसेना भाजपा युतीचं सरकार राज्यात स्थापन झालं आहे.”

“आपण जंगलात जाऊन झाडं तोडतोय, वनसंपदा नष्ट करतोय असं नाही”

मेट्रोमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “पर्यावरणाचा समतोल राखणं आपलं काम आहे. त्यावरून या प्रकल्पावर पर्यावरणाचा ऱ्हास केला असा आरोप होतो. मात्र, आपण इथं आलं की पाहायला मिळतं की, याच्या तिन्ही बाजूने रस्ते आहेत. अगदी आपण जंगलात जाऊन झाडं तोडतोय, वनसंपदा नष्ट करतोय असा काहीच विषय नाही. त्याला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली.”

“मुंबई मेट्रो वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय”

“शेवटी न्यायालयही व्यापक जनहितालाच महत्त्व देत असते. त्यामुळे ३३.५ किलोमीटरची ही भुयारी मेट्रो महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. वाहतूक कोंडीवर हा रामबाण उपाय आहे. लक्षात घेऊनच न्यायालय निर्णय देते,” असंही त्यांनी नमूद केलं.

“आमचं सरकार आल्यानंतर पहिली ऑर्डर भिडेंची काढली”

एकनाथ शिंदे म्हणाले, “अश्विनी भिडे मुंबई मेट्रोचं काम पाहत आहेत. त्या सुरुवातीपासून इकडे आहेत. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिली ऑर्डर त्यांची काढली. शेवटी काम करणारा, स्वतः कामात झोकून देणारा अधिकारीच सरकारचं काम लोकांपर्यंत पोहचवत असतो. नाहीतर एखादा प्रकल्प सुरू आहे आणि चाललंय, चाललंय, सरकारी काम आणि सहा महिने थांब असं आम्हाला काहीही करायचं नाही. आम्हाला कमी वेळेत जास्त काम करायचं आहे.”

हेही वाचा : “सरकार कोसळण्याच्या भीतीने शिंदे गटातील १३-१४ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात”, खैरेंच्या दाव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले…

“आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत”

“आम्हाला फलंदाजी करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत. तसा देवेंद्र फडणवीसांचा पाच वर्षांचा अनुभव आहे आणि मी त्यांच्यासोबत आहे. मी सभागृहातही सांगितलं की, आधी एकच तुम्हाला जड जात होता, आता ‘एक से भले दो’ आहे. आम्ही कुठेही राजकारण करणार नाही. परंतु, लोकांना जे पाहिजे ते आम्ही देणार आहोत,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.