राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. विरोधकांना एकामागून एक धक्के बसत असून, सत्ताधारी शिवसेनेने (शिंदे गट) पुन्हा एकदा आपली ताकद वाढवली आहे. अमरावती विभागाचे अपक्ष शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी अखेर अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यांनी पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्यामुळे पश्चिम विदर्भासह राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सचिन अहिरांनंतर आता किरण सरनाईक शिंदेंसोबत

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे ६ माजी खासदार आणि त्यानंतर विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या मोठ्या घडामोडी ताज्या असतानाच, आता शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही शिवसेना पक्षाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बळ अधिक वाढले आहे. एका विशेष कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी सरनाईक यांचे पक्षात स्वागत केले.

“आमच्याकडे आधीच प्रताप सरनाईक आहेत, आता दुसरे सरनाईक पक्षात येत आहेत…”

आमदार किरण सरनाईक यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “गेल्या आठवड्यात सहा खासदारांनी पक्षात प्रवेश केला, त्यानंतर सचिन अहिर आपल्यासोबत आले. आता शिक्षक आमदार किरण सरनाईक हे शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार आहेत. मी त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करतो.”

…म्हणून एकनाथ शिंदेंची साथ दिली: किरण सरनाईक

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना किरण सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. “राज्याचे तडफदार नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला पक्षात स्थान दिले आहे. त्यांनी भविष्यात मतदारसंघातील कामांसाठी आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पूर्ण पाठबळ व आधार देण्याचे आश्वासन दिले आहे. या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे,” अशा भावना सरनाईक यांनी व्यक्त केल्या. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या शिक्षक प्रतिनिधींचेही त्यांनी आभार मानले.

विदर्भातील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार?

किरण सरनाईक हे अमरावती शिक्षक मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांवर काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी घेतलेल्या या राजकीय भूमिकेमुळे पश्चिम विदर्भातील शिक्षक वर्गात शिवसेनेची पकड मजबूत होण्यास मदत होणार आहे. तर दुसरीकडे, सातत्याने होणाऱ्या या पक्षांतरामुळे विरोधकांसमोर मात्र मोठे आव्हान उभे राहिले आहे.