Eknath Shinde Shivsena Vardhapan Din speech : राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार फोडण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले, तरीही हा फुटीर गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते.

“कुत्ते झुंड में आके भोंकते है, शेर अकेला आता है!”

“एकनाथ शिंदे काय बोलणार? व्यासपीठावर कोण कोण येणार? काय होणार? असे सवाल उपस्थित केले जात होते. अरे, आज ये टायगर आपके सामने खडा है! आज मी बघतोय, काल-परवापासून कुछ कुत्ते रोज भोंक रहे है; पण मी तुम्हाला सांगतो, कुत्ते झुंड में आके भोंकते है, शेर अकेला आता है!” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’चा थेट उल्लेख न करता विरोधकांचा समाचार घेतला.

ये तो सिर्फ ट्रेलर है

ते पुढे म्हणाले, “कुत्ते भोंकते रहते है, टायगर शिकार करता है! कुत्ते भोंकते रहते है और टायगर दहाडता है! ही खरी शिवसेना आहे. आज महाराष्ट्रात आपण पाहत आहोत की, वंदनीय बाळासाहेबांचे आणि धर्मवीरांचे विचार घेऊनच आपण पुढे जात आहोत. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!” असं म्हणत त्यांनी ठाकरेंचे आणखी नेते फोडण्याचे संकेत दिले.

“शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी झाला असून, या माध्यमातून महाराष्ट्राच्या अस्मितेची मोठी चळवळ उभी राहिली. मराठीचा निर्धार, देशद्रोह्यांवर प्रहार, लाडक्या बहिणींचा स्वाभिमान, शेतकऱ्यांचा तारणहार आणि वारकऱ्यांचा जयजयकार म्हणजे शिवसेना!” अशा घणाघाती शब्दांत त्यांनी उपस्थितांमध्ये स्फुल्लिंग चेतवले.

लांडग्यांचं कातडं पांघरून

“मी डॉक्टर नसलो, तरीही अजूनही ऑपरेशन करतो आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. लांडग्याचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही”, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर बोचरी टीका केली.

“४ वर्षांपूर्वी याच लांडग्यांनी मला धमक्या दिल्या होत्या. मुंबईत तर यावंच लागेल. एकनाथ शिंदे एकटा आला, एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर बाजूला ठेवलं. हेलिकॉप्टरमध्ये एकनाथ शिंदे बसला नाही. गाडीत बसला, बायरोड गेला, वरळीतून गेला, वरळीत थांबला. तेव्हा हे धमक्या देणारे घरामध्ये ऑनलाईन बघत होते. आम्हाला काय चॅलेंज देणार. आता म्हणतात हिंमत असेल तर समोर या. रामदासभाई तर बोलले की तुडवायला हे शिवसैनिक पाय जागेवर ठेवतील का? तुडवायला पाय लागतात. हे शिवसैनिक आहेत, कडव्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.