“…तर उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते,” शिवसेनेतील बंडाळीनंतर संजय राऊतांची महत्त्वाची माहिती

शिवसेना पक्षात सध्या उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे असे उघड उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असून ते शिवसेनेचा नवा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

UDDHAV THACKERAY AND EKNATH SHINDE
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (संग्रहित फोटो)

शिवसेना पक्षात सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थक असे उघड उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असून ते शिवसेनेचा नवा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षासंबंधीचे सर्व निर्णय उद्धव ठाकरे यांना घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना- भाजपा युती तसेच मुख्यमंत्रिपदाविषयी महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी भाजपा-शिवसेना यांच्यातील युती कायम राहिली असती तसेच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या कराराची अंमलबजावणी झाली असती तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्रिपदा एकनाथ शिंदे हेच होते, असे राऊत म्हणाले आहेत. ते एबीपी माझाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा >>> “मी सुशिक्षित गुंड आहे, जर बाहेर पडलो तर…”, बंडखोर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचा इशारा!

“भाजपाने शब्द पाळला असता. अडीच- अडीच वर्षे सत्तेचं विभाजन हे भाजपाने पाळले असते तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते. पण भाजपाने बेईमानी केली. म्हणूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि त्याच भाजपासोबत आज एकनाथ शिंदे जायला निघाले आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्षांपूर्वी एका विशिष्ट परिस्थितीत मुख्यमंत्री झाले. तीन भिन्न विचारधारेचे पक्ष सोबत आल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले,” असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदे गटातील आमदार मुंबईत कधी येणार? दीपक केसरकर म्हणाले…

“शिवसेनेचा अडीच वर्षांचा मुख्यमंत्री झाला असता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. अशा वेळी शिवसेनेचे विधिमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले असते. भाजपाने शब्द पाळला नाही म्हणून युती झाली नाही. ते झालं असतं तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावं हे पक्क होतं,” असंही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> Narhari Zirwal Notice : एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या? विधानसभा उपाध्यक्षांची १६ बंडखोर आमदारांना नोटीस, ४८ तासांचे अल्टिमेटम

दरम्यान, एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेला एक नवा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे आज शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली असून या बैठकीत सहा ठराव संमत करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेना सोडून कोणताही राजकीय पक्ष वापरू शकत नाही, असा एक ठराव या बैठकीत समंत करण्यात आला. तसेच सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde should be chief minister of maharashtra if bjp shiv sena alliance exist said sanjay raut prd

Next Story
“तुमच्यावर ईडीचा दबाव आहे का?”; पत्रकारांच्या प्रश्नावर बंडखोर आमदार म्हणाले, “२-३ आमदारांवर…”
फोटो गॅलरी