सातारा : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आडोसा घेत थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर केलेले आंदोलन अतिशय बेजबाबदार आणि धक्कादायक असल्याचा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अत्यंत उच्च सुरक्षा असलेल्या क्षेत्रात आंदोलनाला आवाहन करून राहुल गांधींना नेमके काय साध्य करायचे होते, पंतप्रधानांच्या निवासस्थानी घातपात करायचा होता की देशात अराजकता पसरवायची होती, असा थेट सवाल करत शिंदेंनी राहुल गांधींच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला.

साताऱ्यातील दरे (ता. महाबळेश्वर) या आपल्या मूळ गावी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीतील घडामोडींवर तीव्र शब्दांत भाष्य केले. शिंदे म्हणाले, की विद्यार्थी आणि तरुण हे देशाचे भवितव्य असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या एनडीएच्या बैठकीत त्यांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षांमधील गोंधळानंतर पंतप्रधानांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे पुढील परीक्षा सुरळीत पार पडल्या असून, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी त्यात यश मिळवले आहे. तरीही काही राजकीय पक्ष केवळ आपली ‘राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी’ विद्यार्थ्यांना पुढे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जंतर-मंतरवरील घटना दुर्दैवी आहेच, पण त्याहूनही दुर्दैवी बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार पाडण्याची आणि देशात अशांतता पसरवण्याची भाषा केली जात आहे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विरोधी पक्षांकडून केली जाणारी राजीनाम्याची मागणी ही राजकीयदृष्ट्या प्रेरित असून, कोणत्याही दोषीला सरकार पाठीशी घालणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. विद्यार्थ्यांनी काँग्रेसची ही राजकीय चाल वेळीच ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरही शिंदे यांनी जोरदार निशाणा साधला. ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने नाकारले आहे, ते आता स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी राजकारण करत आहेत. आपल्या संपूर्ण कार्यकाळात जे स्वतः मंत्रालयात फक्त दोनदा गेले, ते आता दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही, कारण राज्यातील जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे, असा दावाही त्यांनी केला.
एकंदरीत, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी दिलेल्या पाठिंब्याला उपमुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा बनवत काँग्रेसला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी देशात अराजकता माजवू दिली जाणार नाही, असा इशारा देत शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकार तरुणांच्या रोजगारासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.