Eknath Shinde Dasara Melava 2024 remark on Uddhav Thackeray : शिवसेना फुटून दोन गट पडल्यानंतर हे दोन्ही गट मुंबईतील दोन वेगवेगळ्या मैदानांवर दसरा मेळावे घेऊ लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यंदा दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही त्यांच्यासारखे घासून-बसून नव्हे तर ठासून दोन वर्षे सरकार चालवलं”.
मुख्यमंत्री म्हणाले, “जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने घासून, बसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. कारण मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, मी आनंद दिघे यांचा चेला आहे, असा स्वस्तात परत जाणार नाही. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळून जाणारा नाही, तर लोकांना पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक कधीच मैदान सोडत नाहीत. शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडत नाहीत. म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे निघालो आहोत”.
…तर हा महाराष्ट्र अनेक वर्षे मागे गेला असता : एकनाथ शिंदे
शिवसेनेचे (शिंदे) प्रमुख एकनाथ शिंदे म्हणाले, “मला सर्व शिवसैनिकांना एक गोष्ट सांगायची आहे, हा एकनाथ शिंदे महाराष्ट्रात जिथे जिथे जातो तिथे तिथे सर्वजण हसतमुखाने स्वागत करून आशीर्वाद देतात. मागील दोन वर्षांमध्ये आपण हेच कमावलं आहे. आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे. लाडक्या बहिणींचं, भावांचं आणि शेतकऱ्यांचं लाडकं सरकार झालं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला सांगितलं होतं, अन्याय झाला तर पेटून उठा, सहन करू नका. अन्यायावर लाथ मारा, त्यामुळेच आम्ही उठाव केला. आम्ही हा उठाव केला नसता तर शिवसेनेचं, शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं. सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता. हा महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता”.
हे ही वाचा >> Sulbha Khodke : मोठी बातमी! काँग्रेसच्या ‘या’ विद्यमान आमदाराचे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन; नेमके कारण काय?
एकनाथ शिंदे म्हणाले, आपलं सरकार सत्तेवर आल्यावर हे राज्य पुन्हा एकदा अनेक बाबतीत पहिल्या नंबरवर आलं. आधीच्या सरकारच्या काळात आपलं राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर होतं, मात्र आपण मेहनतीने ते पहिल्या नंबरवर आणलं.