शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून शिंदे गटावर विविध प्रकारचे आरोप केले होते. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आता संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत कधीही लोकांमधून निवडून आले नाहीत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान दीपक केसरकर यांनी केलं आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “संजय राऊत हे कधीच लोकांमधून निवडून आलेले नाहीत. लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार घटनेनं कोणालाच दिला नाही. मात्र तसा अधिकार आम्हाला मिळाला, तर आम्ही त्यांना परत बोलवू. आमच्या मतांनी तुम्ही निवडून आला आहात. आता आमची इच्छा आहे की तुम्ही राजीनामा द्यावा. तुम्हाला मानणारे कितीतरी लोक महाराष्ट्रात आहेत. त्यांची मतं तुम्ही घ्या आणि ताठ मानेनं राज्यसभेत निवडून जा,” असा टोलाही केसरकर यांनी राऊतांना लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “संजय राऊत आमच्याबाबत ज्या-ज्या गोष्टी बोलले आहेत, त्यामुळे आमच्या मनात त्यांच्याबाबत तीव्र संताप आहे. पण ते केवळ एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे आम्ही एवढेच म्हणू इच्छितो की, तुम्ही परत या आणि राज्यसभेचा राजीनामा द्या, दुसऱ्या आमदारांची मतं घ्या, कृपया आमच्याकडे मतं मागू नका.”

हेही वाचा-पत्राचाळ घोटाळा: संजय राऊतांची ८ तासांपासून ईडीकडून चौकशी

यावेळी त्यांनी राज्यात सध्या ईडीचं (ED) राज्य असल्याचं देखील म्हटलं आहे. ‘E’ म्हणजे एकनाथ शिंदे आणि ‘D’ म्हणजे देवेंद्र फडणवीस असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं. संजय राऊतांना उपरोधीक टोला लगावताना त्यांनी पुढे म्हटलं की, “सध्या क्लीनचीट हा शब्द फार चर्चेत आहे. पण क्लीनचीट देण्यापूर्वी तपास करावा लागतो, त्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांचा चांगला तपास होऊ दे आणि त्यांना क्लीनचीट मिळू दे,”असंही ते म्हणाले.