धर्मवीर २ चित्रपटानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. आनंद दिघेंचं काम हे इतकं मोठं आहे की ते एक-दोन सिनेमात सामावू शकत नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. धर्मवीर 3 हा चित्रपट आलाच तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एबीपी माझाच्या व्हिजनमध्ये एकनाथ शिंदेंची उपस्थिती होती. त्याच कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी हे विधान केलं आहे.

धर्मवीर आला आणि २०२२ चं बंड झालं

धर्मवीर हा सिनेमा प्रदर्शित झाला त्यानंतर अवघ्या सव्वा महिन्यात शिवसेनेत सगळ्यात मोठं बंड झालं. २०२२ मध्ये शिवसेना फुटली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाला आव्हान देऊन एकनाथ शिंदेंनी ४० हून अधिक आमदारांना बरोबर घेत बंड केलं. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची, मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसला बरोबर घेतल्याची, बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्याची टीका त्यांनी त्यावेळी केली होती. त्यानंतर शिवसेना या पक्षाची दोन शकलं झाली आहेत. दरम्यान २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी धर्मवीर २ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. आता एकनाथ शिंदेंनी धर्मवीर ३ बाबत मोठं विधान केलं आहे.

एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिघे आणि धर्मवीर ३ बाबत काय म्हणाले?

“धर्मवीर आनंद दिघे हे माझे गुरु आहेत. त्यांचं काम इतकं मोठं आहे की ते दोन किंवा तीन चित्रपटांमध्ये संपणार नाही. धर्मवीर ३ चं स्क्रिप्ट आता मलाच लिहावं लागेल. कारण पुढे काय काय घडलं आहे ते मला माहीत आहे. ” धर्मवीर २ मध्ये ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ दाखवण्यात आली होती. आता धर्मवीर ३ मध्ये काय असेल याची उत्सुकता कायम आहे. कारण आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला याबाबत विविध चर्चा कायमच होत असतात. एकनाथ शिंदेंनी केलेल्या वक्तव्यानंतर आता चित्रपट येणार का? त्यात आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला? त्यानंतर काय घडलं हे दाखवलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

आम्ही तिघेजण तीन शिफ्टमध्ये काम करतो-एकनाथ शिंदे

साडे तीन वर्षाच्या सरकारला मी १०० टक्के मार्क देणार. आम्ही तिघेजण तीन शिफ्टमध्ये काम करणारे लोक आहोत. आम्हाला जो विजय मिळाला ती जनतेने दिलेली पोचपावती आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. नगरपालिका निडणूकीत विरोधक दिसले नाहीत. विरोधकांना हरण्याचा कॉन्फिडन्स आहे. फेसबुक लाईव्हवरुन तरी सभा करायच्या होत्या असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.काही ठिकाणी आम्ही युती केली, मात्र काही ठिकाणी स्थानिक पातळीवर समीकरणांमुळे वेगळे लढलो. कणकवलीसारख्या शिवसेना-उबाठा युती या निवडणुकीच्या काळात काही छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. पंतप्रधान मोदी एनडीच्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत, त्यांचे हात मजबूत करायचे आहेत असं एकनाथ शिंदे म्हणाले.