scorecardresearch

शिंदे समर्थक आमदाराचं उद्धव ठाकरेंसंदर्भातील ‘त्या’ खळबळजनक पोस्टबाबत स्पष्टीकरण; म्हणाले, “ते मार्च महिन्यात…”

ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंसंदर्भात केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आणि चर्चांना उधाण आलं.

शिंदे समर्थक आमदाराचं उद्धव ठाकरेंसंदर्भातील ‘त्या’ खळबळजनक पोस्टबाबत स्पष्टीकरण; म्हणाले, “ते मार्च महिन्यात…”
प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं स्पष्टीकरण

पश्चिम औरंगाबादमधील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. एकीकडे या चर्चांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे आज शिरसाट यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंसंदर्भात केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आणि चर्चांना उधाण आलं. शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ‘कुटुंबप्रमुख’ असा उल्लेख करत केलेल्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. उद्धव ठाकरेंनी विधानसभेमध्ये दिलेल्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करताना हा उल्लेख शिरसाट यांनी केलं आहे. मात्र, काही वेळानी त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. त्यामुळे शिरसाट आता पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार की काय? अशा प्रकारच्या चर्चा सुरु असतानाच आता यासंदर्भात शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब”, अशा कॅप्शनसहीत शिरसाट यांनी ट्विट केलं होतं. या ट्विटवरुन उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. अगदी शिरसाट पुन्हा ठाकरेंसोबत जाणार पासून हा राजकीय डावपेच असल्यापर्यंत आणि मंत्रीपदासाठी शिरसाटांनी वापरलेलं हे दबावतंत्र असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. मात्र आता यासंदर्भात शिरसाट यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

पत्रकारांनी या डिलीट केलेल्या ट्विटबद्दल प्रश्न विचारला असता शिरसाट यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या ट्विटर अकाऊंटवरुन काल अचानक एक ट्विट पोस्ट झालं. हे मार्च महिन्यामधील ट्विट असून ते अत्ता पोस्ट झालं. ते ट्विट चुकीचं असल्याने ताबडतोब ते तिथून काढलं आहे,” असं उत्तर दिलं. “मला जेव्हा कळालं की ट्विटरच्या माध्यमातून हे पोस्ट झालं आहे तर तातडीने ते काढलं. ते चुकून फॉरवर्ड झालेलं ट्विट होतं. त्याचा चुकीचा अर्थ किंवा चुकीचा समज करुन घेऊ नये.”

हे ट्विटमध्ये तुमचं दबावतंत्र आहे अशी चर्चा आहे, असं पत्रकारांनी विचारलं असता शिरसाट यांनी, “असं दबाव तंत्र संजय शिरसाट वापरत नसतो. जे काही बोलायचं आहे ते तोंडावर बोलत असतो. माझा मागून बोलण्याचा स्वभाव नाही. मी जे आहे ते समोरुन बोलत राहणार,” असं म्हटलं.

आपली पालकमंत्री होण्याची अपेक्षा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर “मी या शहराचा पालकमंत्री व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल,” असं उत्तर दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.