राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “तुम्ही आमचे आई-बाप काढता, आम्ही कधी आमच्या आई-बापांना भेटलो?” असा सवाल करत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. मग गद्दारी आम्ही केली का? असा प्रश्नही उपस्थित केला. ते शनिवारी (३० जुलै) नाशिकमधील मालेगाव येथे सभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली आहे. शिवसेना अशीच मोठी झालेली नाही. वयाच्या १६ व्या वर्षापासून आम्ही शिवसेना वाढीसाठी मेहनत करतो आहे. तुम्ही आमचे आईबाप काढता. आम्ही कधी आमच्या आई-बापांना भेटलो, कधी आमच्या मुलाबाळांना भेटलो ते सांगा. आम्ही वर्षातून दोन दोन, तीन तीन वेळा परदेशात गेलो नाही. फक्त शिवसेना एके शिवसेना करत राहिलो.”

“शिवसेना अशीच मोठी झाली आहे का?”

“आम्ही कधी वेळ-काळ बघितला नाही, दिवस-रात्र बघितली नाही. शिवसेना अशीच मोठी झाली आहे का? बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांमधून शिवसेना मोठी झाली. वेगवेगळ्या विभागात दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्यासारख्या आमच्या नेत्यांच्या मेहनतीमुळे शिवसेना मोठी झाली. आरोप-प्रत्यारोप करणं माझा स्वभाव नाही. परंतु आम्ही गद्दारी केली, विश्वासघात केला, असे आरोप झाले,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. मग गद्दारी आम्ही केली का?”

“भाजपा-शिवसेना युतीने निवडणूक लढलो. लोकांनी आपल्याला कौल दिला. त्या लोकांसोबत सत्तास्थापन करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं. मग गद्दारी आम्ही केली का? विश्वासघात आम्ही केला का? हा विचार करण्याची आवश्यकता आहे,” असंही शिंदेंनी नमूद केलं.

“बाळासाहेबांच्या भूमिकेशी विश्वासघात आम्ही केला की इतर कुणी केला”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला थारा दिला नाही, त्यांना तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी जवळ केलं. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केलं, मग विश्वासघात कुणी केला? तुम्ही केला की आम्ही? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही त्या बाळासाहेबांच्या भूमिकेशी प्रतारणा, विश्वासघात आम्ही केला की इतर कुणी केला याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.”

हेही वाचा : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “”भगतसिंह कोश्यारींना कोल्हापुरी जोडे…”

“आम्हाला सावरकरांविषयी अपमानजनक शब्द काढणाऱ्यांविरुद्ध बोलता येत नव्हतं”

“सावरकरांविषयी अपमानजनक शब्द काढणाऱ्या काँग्रेसच्या लोकांविरुद्ध आम्हाला बोलता येत नव्हतं. तोंडाला पट्टी लावून बसावं लागत होतं. मग विश्वासघात आम्ही केला की आणखी कुणी केला,” असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde verbal attack on uddhav thackeray over saamana interview pbs
First published on: 30-07-2022 at 16:37 IST