काल्र्याचे एकविरादेवी मंदिर अनधिकृत!

भाविकांमध्ये खळबळ उडाली असून त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मावळच्या तहसीलदारांचा दावा
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवीचे मंदिर मावळ तहसीलदारांनी अनधिकृत ठरविले आहे! त्यामुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली असून त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मावळच्या तहसीलदारांनी याबाबत महिनाभराच्या आत जाहीर खुलासा करून भाविकांची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एकविरा देवस्थान ट्रस्टतर्फे देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मावळ तहसीलदारांनी मावळातील काही अनधिकृत मंदिरांची यादी प्रसिद्ध केली. त्या यादीमध्ये पांडवकालीन कार्ला लेण्यांच्या गुंफेतील एकविरा देवीच्या मंदिराचा समावेश करण्यात आल्याने भाविकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
याबाबत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे म्हणाले, ‘‘कार्ला मंदिर प्राचीन आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या नोंदणीमध्येही हे मंदिर असताना तहसीलदारांनी ते अनधिकृत मंदिरांच्या यादीत टाकणे ही बाब अनाकलनीय आहे. या देवीची वर्षांतून दोन वेळा मोठी यात्रा भरते व त्या यात्रेचे नियोजन करण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत असते. किमान याचा विचार हे मंदिर अनधिकृत मंदिरांच्या यादीत टाकताना व्हायला हवा होता.’’
एकविरा देवी मंदिर अनधिकृत असल्याची घोषणा तातडीने मागे घेत तहसीलदारांनी भाविकांची माफी मागत खुलासा करावा, अशी मागणीही तरे यांनी यावेळी केली.

कार्ला डोंगरावरील एकविरा देवीचे मंदिर हे वन विभागाच्या हद्दीत असून त्यांनी दिलेल्या अहवालावरून हे मंदिर अनधिकृत मंदिरांच्या यादीत आले आहे. मात्र तरीही हे मंदिर नियमित करण्यात येणार आहे, किंबहुना यादीमधील बहुतांश मंदिरे नियमित होणार आहेत.
– शरद पाटील,
तहसीलदार, मावळ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ekvira temple illegal