सोलापूर : एका वृद्ध शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात पायाला वजनदार दगड बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना माढा येथे घडली. मात्र, घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. माढा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.शंकर हृषीकेश शहाणे (वय ६५, रा. तेल गल्ली, माढा) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मृताचे नातेवाईक स्वप्नील सुनील शहाणे यांनी पोलिसांना कळविली आहे. त्यानुसार या घटनेची माहिती अशी, शंकर शहाणे हे घरातून बेपत्ता झाले होते. सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता.
दरम्यान, शहाणे यांच्याच शेतात विहिरीजवळ कपडे आणि चप्पल सापडली. त्यांनीच ते काढून ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय निर्माण झाला. त्यानुसार विहिरीत शोध घेतला असता ते सापडत नव्हते. मात्र, पोलिसांसह अग्निशामक यंत्रणेने विहिरीत कॅमेरा सोडला असता, ते विहिरीतच खोल तळाशी दिसून आले. विद्युत मोटारीने विहिरीतील पाणी उपसण्यात आले. दुसरीकडे अग्निशामक दलाच्या जवानांचे विहिरीत शहाणे यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यात अपयश आले.
दरम्यान, माढ्यात वीज मोटार दुरुस्ती करणारे तंत्रज्ञ नागेश कदम हे पाणबुडी घेऊन विहिरीत उतरले आणि थोड्याच वेळात शंकर शहाणे यांचा मृतदेह सापडला. त्यांनी पायाला दगड बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.