अलिबाग – अलिबाग तालुक्यातील चौल इथं चोरीच्या उद्देशाने घरी एकट्याच राहणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा खून झाल्याचे समोर आलं आहे. मंदा म्हात्रे असं मृत महिलेचे नाव आहे. आपल्या माहेरच्या मालमत्तेची देखरेख करण्यासाठी ही महिला चौल इथं एकटीच रहात होती.

चौलच्‍या टेकाळकर आळी येथील घरी एकटी राहत असलेल्या मंदा प्रमोद म्हात्रे यांच्‍यावर काल (बुधवारी) खुनीहल्‍ला झाला आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करताना झालेल्या झटापटीत त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तिच्या मानेवर जखमेचे व्रण दिसत असून अंगावरील दागिने खेचताना झालेल्या झटापटीत या जखमा झाल्याचे सांगितले जाते.

घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस, श्वान पथक तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैरू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मृत मंदा म्हात्रे या गेल्या सुमारे दहा वर्षांपासून माहेरच्या मालमत्तेची देखरेख करण्यासाठी टेकाळकर आळी येथील घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती प्रमोद शांताराम म्हात्रे हे गुंजीस, येथे वास्तव्यास आहेत. २८ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पती-पत्नींचा फोनवर संपर्क झाला होता. मात्र सकाळी साडेदहा वाजल्यानंतर मंदा म्हात्रे यांचा फोन उचलला जात नसल्याने संशय बळावला. दिवसभर संपर्क न झाल्याने रात्री सुमारे ८ वाजता प्रमोद म्हात्रे घरी आले असता घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर मंदा म्हात्रे या किचनमध्ये पडलेल्या आढळून आल्या.