राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षचिन्ह आणि पक्षावर दावा सांगितला आहे. ३० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष बदलल्याची माहितीही अजित पवार गटाकडून भारतीय निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. यानंतर आता निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला नोटीस पाठवली आहे. पक्षनाव आणि चिन्हाबाबत पाठवलेल्या नोटीसला तीन आठवड्यांच्या आत उत्तर द्यावं, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

खरं तर, अजित पवार गटाने पक्षातून बाहेर पडून भाजपाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा पाठवल्या होत्या. संबंधित नोटीसवर १७ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास आयोगानं सांगितलं होतं. पण शरद पवार गटाने संबंधित नोटीसला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे चार आठवड्यांचा अवधी मागितला होता.

पण निवडणूक आयोगानं तीन आठवड्यांचा अवधी वाढवून दिला आहे. त्यामुळे आता त्यांना ८ सप्टेंबर रोजी दोन्ही गटांना संबंधित नोटीसला उत्तर द्यावं लागणार आहे. याआधी अजित पवार गटाकडून काही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. त्यामध्ये अजित पवार गटाने राष्ट्रवादीचं नाव आणि पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितला आहे.

हेही वाचा- “मोदींविरुद्ध आगपाखड करणारी व्यक्ती…”, अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेवरून मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

२ जुलै रोजी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी पक्षातून बाहेर पडत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. अजित पवार अचानक सत्तेत सहभागी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अजित पवार गटातील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथही घेतली होती.