मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असल्याचा खुलासा द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तातून करण्यात आला होता. देशातील सत्ताधारी पक्षाची शाखा असल्यासारखं काम करत ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या (SIR) नावाखाली मतदारांची घोर फसवणूक केली आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला आहे. या फसवणुकीविरोधात दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र आले असून येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत एका भव्य जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भातील एक्स पोस्ट केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे या मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाच्या आयोजनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला, तरी हा केवळ एका पक्षापुरता मर्यादित नसून तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल, असं दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. या मोर्चाला व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्यातील इतर सर्व राजकीय पक्षांशी संवाद साधून त्यांनाही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जाहीर आवाहन
“देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हावं” असं जाहीर आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे. या जनमोर्चाची निश्चित वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर केलं जाईल, असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही याचिका
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मतदार यादीतून १३ कोटी मतदारांची नावे कथितपणे वगळल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी विशेष तपास पथकाच्या (SIT) माध्यमातून चौकशी करण्याची मागणी एका याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
