scorecardresearch

पदवीधर, शिक्षकच्या पाच मतदारसंघांत ३० जानेवारीला निवडणूक; भाजप, महाविकास आघाडीत लढत

नाशिक आणि अमरावती पदवीधर तर कोकण, नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक अशा पाच मतदारसंघांत निवडणूक होत आहे.

पदवीधर, शिक्षकच्या पाच मतदारसंघांत ३० जानेवारीला निवडणूक; भाजप, महाविकास आघाडीत लढत
(संग्रहित छायाचित्र) फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मुंबई : विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर तर कोकण, नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक अशा एकूण पाच मतदारसंघांत ३० जानेवारीला निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढणार असून, भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत लढत होईल.

नाशिक आणि अमरावती पदवीधर तर कोकण, नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक अशा पाच मतदारसंघांत निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १२ जानेवारीपर्यंत आहे. ३० जानेवारीला मतदान तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सर्व विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात

नाशिक पदवीधरमध्ये काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली. त्याचप्रमाणे अमरावती पदवीधरमध्येही भाजपने विद्यमान आमदार डॉ. रणजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून शेकापचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. औरंगाबाद शिक्षकमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विक्रम काळे यांनी यापूर्वीच निवडणुकीची तयारी केली आहे. नागपूर शिक्षकमध्ये भाजपने अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही.

भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या युतीत कोकण शिक्षक मतदारसंघावर बाळासाहेबांच्या शिवसेनेने दावा केला आहे. कोणी कोणती जागा लढायची याचा निर्णय युतीत होईल, पण कोकण शिक्षक मतदारसंघ मिळावा अशी पक्षाची अपेक्षा असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले.

कोकण शिक्षक हा पारंपारिक भाजपचा बालेकिल्ला होता. पण गेल्या निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांनी भाजपचा पराभव केला होता. यामुळे यंदा भाजपने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातही भाजप यंदा लढत देण्याची शक्यता आहे.

निवृत्त होणारे सदस्य

नाशिक पदवीधर : डॉ. सुधीर तांबे (काँग्रेस)

अमरावती पदवीधर : डॉ. रणजित पाटील (भाजप)

कोकण शिक्षक : बाळाराम पाटील (शेकाप)

नागपूर शिक्षक : नागो गणार (भाजप)

औरंगाबाद शिक्षक : विक्रम काळे (राष्ट्रवादी)

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 06:12 IST

संबंधित बातम्या