डिसेंबरमध्ये ८ पालिका तर फेब्रुवारीत जिल्हा परिषदेची मुदत संपणार

नगर : पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये होणाऱ्या जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुका तसेच फेब्रुवारीमध्ये होणारी जिल्हा परिषदेची निवडणूक यामुळे विधान परिषदेच्या नगरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी लांबणीवर पडलेली निवडणूक आता एप्रिल २०२२ मध्येच होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून इच्छुकांना सुरू केलेल्या मोर्चेबांधणीवर पाणी फेरले गेले आहे. या इच्छुकांनी दिवाळीची संधी शोधत मतदारांच्या गाठीभेटी घेण्याची मोहीम  राबवली होती.

राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मात्र नगरची जागेची निवडणूक लांबणीवर टाकली आहे. या पाश्र्वभूमीवर आता विधान परिषदेच्या नगरच्या जागेची निवडणूक एप्रिल २०२२ नंतर म्हणजे सहा महिन्यानंतरही होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

विधान परिषदेच्या नगरच्या जागेसाठी आवश्यक असणाऱ्या दोन निकषापैकी एक निकष अपूर्ण ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नगरच्या जागेची निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र निकम यांनी दिली. विधान परिषदेच्या मतदार असणाऱ्या जिल्ह्यात १८ संस्था आहेत. त्यातील केवळ १२ कार्यरत आहेत. हे प्रमाण ६६.६६ टक्के आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ५१४ जागा आहेत. त्यातील ६ पालिकांची मुदत संपल्याने तेथे प्रशासक नियुक्त आहेत. त्यामुळे ३९६ मतदार अस्तित्वात आहेत हे प्रमाण ७७.०४ टक्के आहे. त्यामुळे मतदारांची संख्या निकषात असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था ७५ टक्के कार्यरत असण्याचा निकष पूर्ण होत नाही. त्यामुळेच नगरच्या जागेची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील महिन्यात, डिसेंबर अखेरीपर्यंत जिल्ह्यातील ८ नगरपालिकांच्या मुदती संपुष्टात येत आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत फेब्रुवारीमध्ये संपत आहे. जिल्हा परिषदेची यापूर्वीची निवडणूक दि. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी झाली होती. दि. २१ मार्च २०२२ रोजी नवीन सभागृह अस्तित्वात येईल. त्यानंतर विधान परिषदेच्या नगरच्या जागेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

प्रशासक नियुक्त नगरपालिका

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या व प्रशासक नियुक्त असलेल्या नगरपालिका पुढीलप्रमाणे- अकोले, शेवगाव, पारनेर, कर्जत, जामखेड व भिंगार छावणी परिषद. भिंगार छावणी परिषदेवर सध्या केंद्र सरकारने उपाध्यक्ष म्हणून भाजपचे वसंत राठोड यांची नियुक्ती केली आहे. परंतु ते निवडून आलेले सदस्य नसल्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होणार नसल्याची जाणकार सूत्रांनी सांगितले.

डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या पालिका

जिल्ह्यातील डिसेंबर अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या नगरपालिका पुढीलप्रमाणे- श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, देवळाली प्रवरा, राहता, पाथर्डी व शिर्डी. नगर महापालिका व श्रीगोंदे नगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप अवधी आहे.