अहिल्यानगर: जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारांचे वर्चस्व आणि जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा बँकेला मतदार यादी तयार करण्याचे आदेश सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. सध्या बॅंक राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजपच्या ताब्यात आहे.
सहकार विभागाच्या आदेशानुसार जिल्हा बँक प्रशासनाकडून मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना मतदानासाठी ठराव करावा लागणार असून त्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला राज्य शासनाने स्थगिती दिली होती. मात्र आता ही स्थगिती उठविण्यात आल्याने जिल्ह्यात जिल्हा बँकेसह मुळा, लोकनेते मारूतराव घुले, वृद्धश्वेर या तीन सहकारी साखर कारखान्यांसह १५३ सेवा संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या विद्यमान संचालकांची मुदत २० फेब्रुवारीलाच संपुष्टात आली. ही मुदत येण्यापूर्वी तीन महिने अगोदर बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होते. मात्र राज्य शासनाने यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका न घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. परंतू आता या निवडणुका होणार असून त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे.
जिल्हा बँकेच्या २१ संचालक मंडळाच्या जागा असून त्यात १४ जागा या सेवा सोसायट्यांसाठी आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना आता मतदानासाठी ठराव द्यावा लागणार आहे. त्यामुळे ठराव कोणला मतदान करण्याचा अधिकार देते. यावर निवडणुकीचे गणित ठरते. सहकार खात्याने बँकेला मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल. सोसायट्यांना ठराव देण्यासाठी महिनाभराची मुदत आहे.
याशिवाय तीन सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मुळा सहकारी साखर कारखाना, लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना व वृद्धश्वेर सहकारी साखर कारखाना यांची निवडणूक प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. मुळा कारखान्याची मुदत १८ जानेवारी, ज्ञानेश्वर कारखान्याची मुदत २० जानेवारी तर वृद्धश्वेर कारखान्याची मुदत २८ जानेवारीला संपुष्टात आली आहे. संस्था सभासद व व्यक्तिगत सभासद हे दोन मतदार या कारखान्यांसाठी आहेत. पुढील आठवड्यात मतदार यादी करण्याचे सांगण्यात येणार असून त्यासाठी २५ दिवसांचा कालावधी राहणार आहे.

