शरद पवार यांनी खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा मी राजकारण सोडेन, असं जाहीर आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केलं होतं. त्यावर भाजपाने नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पलटावर करत तुम्हाला राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही. जनताच तुम्हाला संन्यास घ्यायला लावेल, असा टोला त्यांनी लगावला होता. आता त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“राजकारणात कुणी साधूसंत असतं का? तुमचं आज महाराष्ट्रात बहुमत नाही आहे. भले आमचं तीन पक्षाचं सरकार आहे पण ते बहुमतात आहे ना. तरी तुम्हाला तुमचं सरकार यावं वाटतं यालाच राजकारण म्हणतात आणि दुसऱ्याने केलं तर पाठीत खंजीर खुपसणे. तुम्ही भल्या पहाटे अजित पवारांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण आणि दुसरं कोणी केलं असतं कर पाठीत खंजिर खुपसणं. मध्य प्रदेश माधवराव शिंदेंच्या सुपुत्रांना तुम्ही फोडलतं ते राजकारण दुसरं कोणी केलं असतं कर पाठीत खंजिर खुपसणं. त्यामुळे आता हे शब्द आता राजकारणामध्ये पण वापरु नयेत,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

जनताच आता त्यांना घरी बसवेल असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटल्याचे माध्यमांनी सांगितल्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “सध्या तरी जनतेने आम्हाला घरी बसवलेलं नाही. तुम्हाला बसवलं आहे. सध्या आम्ही सत्तेत आहोत आणि पुढली तीन वर्षे आम्हीच राहणार आहोत. आमची महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत आहे. तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीतही तुम्हाला विरोधी बाकांवरच बसावं लागणार आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.