जिल्ह्य़ातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ जीवनज्योती’ योजनेअंतर्गत एकूण ६५७ कोटी रुपयांचा आराखडा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी खा. सदाशिव लोखंडे, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते. शहरी भागासाठी ९७ कोटी रुपये खर्चाचा तर ग्रामीण भागासाठी ५६० कोटी रुपये खर्चाचा आराखडा आहे.
भारनियमनामुळे रोज नगर शहराचा किमान निम्मा भाग अंधारात असतो, याकडे लक्ष वेधून खा. गांधी यांनी सांगितले की, ही अडचण दूर करण्यासाठी शहरात ३३ के. व्ही. क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारले जाणार आहे, त्यासाठी सावेडीत डौले रुग्णालयाजवळ, भिस्तबाग चौकाजवळ व जुन्या बसस्थानकाजवळ जागेची पाहणी करण्यात आली, मात्र महापालिकेने जागा उपलब्ध करुन दिलेली नाही, शहराची चिंता आम्हालाच असल्याने पाठपुरावा करीत आहोत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी.
याशिवाय श्रीगोंदे येथे ४०० के. व्ही. संगमनेर, पारनेर, राजुर येथे २२० के. व्ही., मातापूर, शिर्डी, कोळपेवाडी, चापडगाव, धोत्रे याठिकाणी १३२ के. व्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारणे प्रस्तावित करण्यात आलेआहे. नेवासे तालुक्यात ३ उपकेंद्र उभारण्याची आवश्यकता आ. मुरकुटे यांनी मांडली.