हिंगणघाट या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा झाली. मात्र या सभेसाठी वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरानंतर वीज वितरण कंपनीने कारवाई केली. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शरद पवार यांच्या सभेचं आयोजन गोकुळधाम मैदानावर करण्यात आलं होतं. या ठिकाणी अपेक्षित विद्युत पुरवठा शक्य नसल्याचे दिसून आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांनी अन्य प्रकारे जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला.

सभेच्या ठिकाणी असलेल्या जागेजवळच्या वीज पुरवठा करणाऱ्या खांबावर आकडा टाकून वीज पुरवठा घेण्यात आला. अशाप्रकारे चोरीच्या मार्गाने वीज घेऊन शरद पवार यांची सभा पार पडली. सभेनंतर आकडा टाकून वीज पुरवठा करण्यात आला याची चर्चा चांगलीच रंगली होती. याप्रकरणी वीज चोरी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाईल अशी माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंते एच. एम. पाटील यांनी सांगितले.

दरम्यान आज हिंगणघाट येथे झालेल्या सभेत शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. हे सरकार शेतकऱ्यांशी घेणंदेणं नसलेलं सरकार आहे अशी टीका शरद पवार यांनी केली.