सातारा : वीज कर्मचाऱ्यांच्या कामगिरीला सलाम! अतिवृष्टीनंतर ६ दिवसांत ४१० गावांचा वीजपुरवठा पूर्ववत!

साताऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे ४२६ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजकंपन्यांनी ६ दिवसांत त्यातल्या ४१० गावांत पुन्हा वीज आणली आहे!

electricity polls in satara
साताऱ्यात वीज कर्मचारी काम करत असताना!

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे शेकडो ठिकाणी विजेचे खांब गाडले गेले तर कुठे महापुराने वाहून नेले. परिणामी ४२६ गावांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र गेल्या सहा दिवसांच्या अथक परिश्रमाने वीज कर्मचाऱ्यांनी मोठी जोखीम पत्करुन ४१० गावे पुन्हा प्रकाशमान करण्यात यश मिळवले आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे. २१ व २४ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक अतिवृष्टी झाली. ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनात अनेकांचे जीव गेले. तब्बल ४२६ गावे व तेथील २०५० रोहित्रांना याचा फटका बसला. दीड हजारांहून अधिक खांब जमीनदोस्त झाले. घरगुती व व्यापारी वर्गवारीतील ६६ हजार ६५६ वीजग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला. संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले. हे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी वीजपुरवठा पूर्ववत आणणे गरजेचे होते. महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी मोठ्या हिंमतीने व अतिशय जोखीम पत्करून हे आव्हानात्मक काम अत्यंत कमी कालावधीत पूर्ण करत आणले आहे.

दलदलीतही पाय रोवून उभे आहेत कर्मचारी!

बुधवारी (दि. २८) दुपारपर्यंत ४२६ पैकी ४१० गावे सुरु झाली आहेत. १८१ पोल उभे करुन बंद पडलेली १५६४ रोहित्रे सुरु केली. त्यामुळे घरगुती, व्यापारी मिळून ६४ हजार ४२४ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु झाला तर शेतीच्या १७ हजार २४४ पैकी ८ हजार ४२२ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. सर्व मिळून ७३ हजार ८९ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात यश आले आहे. अतिवृष्टीमुळे मेढा उपविभागातील केळघर उच्चदाब वाहिनीचे १२ खांब पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने १२ गावांचा वीजपुरवठा ठप्प झालेला. मंगळवारी (दि.२७) जिथे चिखलात रुतलेला एक पाय काढण्यासाठी दुसऱ्याची मदत लागते, अशा दलदलीत वीज कर्मचाऱ्यांनी व स्थानिक ठेकेदारांच्या कामगारांनी मोठ्या हिंमतीने अंगा-खांद्यावर कावड करुन खांब वाहून नेले.

प्रतिकूल परिस्थितीतही कौतुकास्पद कामगिरी!

सतत पडणारा पाऊस, पुरामुळे साचलेला गाळ तसेच तीन ठिकाणी नदीवरून गेलेल्या विजेच्या तारा यामुळे काम करण्यात अडचणी येत होत्या. या सर्व अडचणींवर मात करुन मेढा व आणेवाडी शाखेच्या कर्मचाऱ्यांनी व बाह्यस्त्रोत कामगारांनी १२ खांब उभे करुन त्यावर अवलंबून असलेल्या केळघर, केडंबे, नांदघणे, वरोशी, पुनवडी, डांगरेघर, कुरुळोशी, धावली, तळोशी, वाळंजवाडी, वाटंबे, मुकवली, या गावांतील एकूण ७२८ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील १६ गावांतील वीजपुरवठा बंद असून, तो सुरू करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. बंद असलेल्या गावांची तालुकानिहाय नावे खालीलप्रमाणे :

महाबळेश्वर :- धारे, बिरवडी, जावली, छतीरबेट, घोणसपूर व घरोशी

जावळी :- वहिटे, बाहुले, भूतेघर व बोंडरवाडी

पाटण :- निगडे, कठनी, घोटील, जिंती व उमरकांचन

कराड :- जुझारवाडी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Electricity workers brings back electricity of 410 villages in satara within 6 days of heavy rainfall pmw

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या